मोलकरीण 16
मालती म्हणाली. “मलाही पुढे त्याची जाणीव झाली; मलाही ती भूक लागली. परिक्षा पास झाली म्हणजे मला वाटे, मी कोणाला सांगू ? काकूला उलट मत्सरच वाटला असता. काकांनाही मी प्रिय नव्हते. मला कोणी नव्हते. एके दिवशी मी टेकडीवर बसून रडत होते. रात्र झाली होती. दगडावर बसून मी हुंदक्यावर हुंदके देत होते.”
राधाबाई म्हणाल्या, “परंतु तुम्हाला आता केवढे रत्न मिळाले आहे ! बाळासाहेबांसारखी ठेव तुम्ही मिळविली आहे. प्रेमाचे माणूस, मायेचे माणूस तुम्हाला मिळाले आहे.”
मालती म्हणाली, “होय हो, मी सुखी आहे. देव हे सुख ठेवो ! दुसरे काय ?”
बाळंतिणीचा बिछाना साफ करावा, पलंगपोस नवीन चुरचुरीत घालावा, जुना धोब्याला काढून द्यावा, उशीचे अभ्रे स्वच्छ घालावे, मालतीची लुगडी धुवावी, पोलकी धुवावी, हातरुमाल धुवावे, सारे काम राधाबाई करीत. एखाद दिवशी बाळासाहेबांचे धोतरही धुवावे लागे. लहानपणी बाळाच्या सद-याला साबण नव्हता, म्हणून बाळ रडत असे; परंतु आता साबणाला वाण नाही- “लावू दे बाळाच्या धोतराला भरपूर साबण ! असे त्या मनात म्हणत. बाळाचे धोतर त्या स्वच्छ धूत. बाळाचे धोतर धुताना बाळाचे वैभव मनात येऊन त्यांना आनंदाश्रू येत.
कधी पतीचे मरण, त्यांची झालेली मानखंडना, हे सारे मनात येऊन त्यांचे हृदय भरून येई, त्यांचे डोळे भरून येत. परंतु त्या पुन्हा शांत होत. प्रेम ! प्रेमाला मोबदला नको, मान नको. प्रेमाला पती-प्रेमाचीही अपेक्षा नसते, आपणाला प्रेम करावयास मिळाले, सेवा करावयास मिळाली, जिच्यावर आपले प्रेम आहे त्या व्यक्तीला सुख देता आले, यातच ख-या प्रेमाला आनंद असतो. जिच्यावर आपण प्रेम करतो, ती व्यक्ती भाग्यात आहे, सुखस्वर्गात आहे, हे पाहून आपण आपले दुःख, आपली मानखंडना, सारे विसरून गेले पाहिजे. प्रेमभूत व्यक्तीचे भाग्य ते आपलेच, असे ख-या प्रेमाला वाटते. असे प्रेम निःस्वार्थ झाल्याशिवाय करताच येत नाही.
एके दिवशी राधाबाई दिनेशला पाळण्यात निजवीत होत्या. मालती आता बाहेर हिंडे-फिरे. पती बरोबर ती खेळायला जाऊ. एके दिवशी दोघेजण खेळून येऊन दिवाणखान्यात बसली होती. राधाबाई दिनेशला खाली ओव्या म्हणत होत्या. तो आवाज ऐकून बाळासाहेब जरा चमकले, विशेषतः त्या ओव्या त्यांना ओळखीच्या वाटल्या. हृदयातील अगदी खालचा भाग जागृत झाला. बाळासाहेब मालतीला म्हणाले, “त्या बाई अगदी मनापासून काम करतात, नाही ?” मालती म्हणाली, “खरेच, माझ्या अंगाला लावतात-जसा आईचा हात ! मुलांचे सारे त्याच करतात. नरेश तर त्यांची पाठ सोडीत नाही. ‘आजीबाई, आजीबाई’ करून त्यांच्या पाठीस लागतो. प्रेमळ आणि कामसू आहे म्हातारी. मला सांगतात, ‘हे खा, हे खाऊ नका.’ मला हसू येते. त्यांना एक लुगडे घेऊन द्यावे. माझे जुनेरी दिले असते, परंतु त्या तसले काही नेसत नाहीत. त्यांचे लुगडे फाटले आहे.” बाळासाहेब म्हणाले, “आपल्या खंडूला सांग. तो चांगले घेऊन येईल, लाल रास्ता का कोणते हवे, ते विचार त्यांना.”