विश्राम 9
चार दिवस गेले. दिनकरराव हिंडूफिरू लागले. एके दिवशी रात्री दिनकरारव असेच काठी टेकीत टेकीत विश्रामच्या घरी आले. विश्राम ओटीवरच होता. म्हातारा शेगडीजवळ शेकत होता. धन्याला पाहताच विश्राम उठला. त्याने बसायला घोंगडी घातली. म्हातारा उठून बाहेर आला.
म्हातारा : आज रातचे कोणीकडे? हातात दिवा आणावा की नाही? आता बरे वाटते ना?
दिनकरराव : होय, बरे वाटते. तुझ्या मुलाने आपल्या प्राणांचे मोल देऊन मला वाचवले. विश्राम तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही.
विश्राम : असे बोलू नका, धनीसाहेब. असे बोलणे तुम्हाला शोभत नाही. आम्हा गरिबांना लाजवू नका. आमच्या प्राणांची कसली किंमत? विष उतरावे म्हणून कोंबड्या नाही का लावीत? त्या नाही का मरत? तसेच आमचे प्राण!
दिनकरराव : विश्राम, नको असे बोलू! असे बोलून तू लाजवितो आहेस, तू म्हणतोस ते खरे आहे. गरिबांच्या प्राणांना, जगात किंमत नाही. ते मोतीमोल आहेत. श्रीमंतांकडची गायीगुरे, कुत्रीमांजरे, पोपटमैना यांच्याही प्राणांची किंमत त्याहूंन अधिक मानली जाते. आम्ही श्रीमंत तुमच्या श्रमांवर जगतो आणि तुम्हालाच तुच्छ मानतो; तुमच्या श्रमांवर आम्ही श्रीमंत होतो आणि तुम्हाला दारिद्र्यात ठेवतो. आमच्याकडे रोज डॉक्टर येतात, तुम्हाला औषधालासुद्धा थेंबभर दूध मिळत नाही. आम्ही अजीर्णाने मरतो, तुम्ही अन्न न मिळाल्याने मरता. वृक्षाचा रस शोषूण बांडगुळ वाढते आणि वृक्षालाच मारते; तशीच आम्ही बांडगुळे आहोत! आमच्या वैभवाचा पाया म्हणजे तुम्ही. तुम्ही मेला तर आम्हाला मरावे लागेल. आपल्या त्या तळ्यात कमळे असतात. कमळ वर कसे सुंदर दिसते! परंतु देठ चिखलात असतो. देठ सुकला तर कमळ सुकणारच. विश्राम, कमळाच्या देठासारखे तुम्ही चिखलात कामे करता अन् आम्ही पांढरपेशे वर कमळाप्रमाणे मिरवतो! परंतु आम्ही विसरतो की, हे देठ जर सुकले तर आम्हालाही सुकावे लागेल. विश्राम! मी तुला चोर म्हटले. अरेरे! खरे पाहिले तर आम्हीच चोर आहोत, शतचोर आहोत! मला लाज वाटते, विश्राम!
म्हातारा : जाऊ द्या. असे मनाला लावून नका घेऊ.