Get it on Google Play
Download on the App Store

विश्राम 3

विश्राम म्हणाला, “तुला सारखे उभे राहून कांडताना पाहून मला रडू येत होते. सगुणे, एकाने रडावे न् एकाने हसावे, असेच हे जग आहे. काहीही काम न करता मालकाला, त्याच्या मुलांना सारे मिळते; परंतु दिवसभर काम करूनही आपणाला पुरेसे नाही! देवाला हा अन्याय कसा पाहवतो? आता कपाळ जरा बरे आहे का ?”

सगुणा म्हणाली, “बरे वाटते, तुम्ही आता झोपा.”
विश्राम म्हणाला, “उद्या धन्याला थोडे दूध देता का विचारीन.”
सगुणा म्हणाली, “तो काही देणार नाही. श्रीमंत श्रीमंताला देतील, परंतु गरीबाला नाही देणार!”

दुस-या दिवशीही सगुणा कपाळ अती दुखत होते तरी कामाला गेली. विश्रामही नित्याप्रमाणे गेला. म्हातारा कामावर गेला नव्हता. तो घरीच होता. अंगणाच्या कडेला लावलेल्या वेलांना तो पाणी घालत होता. कामाचे शरीर-थोडेफार काम केल्याशिवाय त्याला बरेच वाटत नसे.

त्या रात्री थोडे दूध घेऊन जायचे, असे विश्रामने ठरविले होत. लहानशी लोटी त्याने बरोबर आणली होती. त्याचे एक मन त्याला सांगे, “विश्राम विचारल्याशिवाय नेणे ही चोरी आहे. चोरी करू नको. मेलास तरी चालेल, पण चोरी नको.” त्याचे दुसरे मन म्हणे, “चोरी कसची ? चोर कोण ? या गायी-म्हशींची सेवा-चाकरी मी करतो. त्यांचा गोठा मी झाडतो, मी त्यांना धुतो, त्यांना चारा घालतो. माझा आवाज ऐकताच गायी-म्हशी हंबरतात, माझ्यावर त्यांचे किती प्रेम! या गायी-म्हशींच्या दुधावर माझी सत्ता नाही का ? त्यांचे दूध मी घेतले तर ती का चोरी होईल ? धनी चोर आहे! तो फुकट खातो. मीच या दुधाचा मालक आहे.” विश्रामच्या मनात दिवसभर झगडा चालला होता. धनी चोर का आपण चोर, हे तो ठरवीत होता.

सायंकाळ झाली. विश्रामने धार काढली. सा-या दुभत्या ढोरांचे दूध काढता काढता त्याची बोटे थकून जात असत. एवढ्या दुधातील अद्पाव दूध त्याने घेतले, तर ती का चोरी ? नाही-बिलकुल नाही. विश्रामने, तो पाहा लोटी भरून ठेवली. गोठ्यात लपवून ठेवली. तो देवाला म्हणाला, “सगुणाला बरे वाटले म्हणजे नाही घेणार. ती जर आजारी पडली तर सारीच पंचाईत पडेल. ती घरलक्ष्मी. ती धडधाकट हवी. देवा, अपराध होतच असेल तर क्षमा कर.”

रात्री सारे काम आटोपल्यावर विश्राम ती लोटी घेऊन निघाला. ती लोटी लपवीत लपवीत तो चालला होता. तो घरी गेला. सगुणा वाटच पाहत होती. विश्राम तिला म्हणाला, “सगुणे, हे घे थोडे दूध. दोन दिवस कडकडीत तापवून घे म्हणजे डोके राहील.”

सगुणेने विचारले, “तुमच्या मालकाने दिले वाटते?  दगडाला घाम आला आज!”
विश्राम म्हणाला, “तू ते तापत ठेव.”

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29