विश्राम 7
दिनकररावांचे प्राण येत होते व विश्रामचे जाऊ पाहात होते. त्याच्या तोंडातून फेस येत होता. सगुणा हात घालून तो फेस बोटांनी काढीत होती. सगुणा विश्रामचे डोके मांडीवर घेऊन बसली होती. लोक उपचार करीत होते. परंतु आशा दिसेना. म्हातारा मधून मधून हुंदके देई. सगुणा धीराची होती. तिच्या हृदयात अलोट श्रद्धा होती, ती मामंजींना म्हणे, “असे रडू नका, मामाजी. देव इतका निष्ठूर नाही.” कोणी म्हटले, “काय आताची पोरे तरी! सुखाचा जीव धोक्यात घालण्याचे काय अडले होते?” दुसरे कोणी बोलले, “बाप रागावला म्हणून त्याने हे मरण पत्करले. म्हाता-या, तुझे शब्द पोराला विषाप्रमाणे झोंबले!” म्हातारा काय बोलणार? तो एकदम सगुणेला म्हणाला, “पोरी, तुझ्या नव-याला मी मारले, मी तुडविले!” सगुणा-गुणाची सगुणा म्हाता-यास म्हणाली, “रडू नका, सारे सोने होईल.”
रात्र गेली. अंधार सरला परंतु सगुणेच्या घरात अंधारच होता, म्हाता-याच्या मनात अंधार होता. सगुणा डोके मांडीवर घेऊन बसली होती. ती उठली नाही. “पतीचे प्राण परत येतील, नाही तर माझे तरी त्यांच्या भेटीस जातील,” या सावित्रिच्या निश्चयाने ती तेथे बसली होती. लोकांची ये-जा सुरू होती. कोणी काही सांगे, सगुणाचे कशातही लक्ष नव्हते. तिचा जीव परमेश्वराच्या दारी जणू प्राणाची भीक मागण्यासाठी गेला होता.
तो पाहा, एक कातक-याचा पोरगा येत आहे. त्याच्या हातात तिरकमठा आहे, डोकावर केसांची झुलपे वाढलेली आहेत. काळासावळा पोरगा. नेसू लंगोटी आहे; अंगावर दुसरे काही नाही. सुंदर व तजेलदार आहे त्याचा चेहरा! डोळे किती पाणीदार! नाक कसे सरळ, सुंदर, तरतरीत! कोणी एकाने त्याला विचारले, “का रे मुला, सापाच्या विषावर औषध आहे का माहीत?”
तो कातक-याचा पोर म्हणाला, “औषधाला काय तोटा! कुणाला चावला आहे?”
लोकांनी त्या कातक-याला विश्रामकडे आणले. कातक-याने विश्रामच्या डोळ्यांना हात लावला व क्षणभर त्याच्याकडे पाहिले. नंतर तो बाहेर गेला व कसली तरी मुळी घेऊन आला. त्याने ती विश्रामच्या नाकाजवळ धरली. सगुणा देवाला आळवीत होती. तो पाहा विश्राम कुशीवर वळला. सगुणेच्या मांडीवर इकडचा तिकडे वळला. “यांना आता गुण पडेल. सांजपावतो असेच निजू दे.” असे म्हणून तो कातक-याचा मुलगा निघून गेला.
तो निघून गेल्यावर लोक म्हणू लागले, “अरे, कसली मुळी ती त्याला विचारा. त्याच्याजवळून घेऊम तरी ठेवा, जा रे पोरांनो.” कातकरी कोठे गेला? पोरे पाहू लागली. कोणी म्हणत इकडे गेला. कोणी तिकडे गेला. कोणी म्हणे येथे बसला होता. कोणी म्हणे तिकडे उभा होता, परंतु त्या पोराचा पत्ता लागला नाही. एका क्षणात तो कोठे गेला ? तो विजेसारखा आला वा-यासारखा गेला!