शशी 25
हरदयाळ : तुमचा पोरगा हाताळ आहे वाटत ? शशीला सतरांदा सांगितले, की त्याची संगत धरू नको म्हणून. पण ऐकेल तर हराम ! आज चांगलाच फोडून काढला आहे.
दादू : तुमचा मुलगा कोठे आहे ? निजला का ?
हरदयाळ : त्याला आज उपाशी ठेवले आहे.
दादू : नका हो त्याचे हाल करू. जेवायला घाला. शाळेत मास्तरांनी मारले, घरी तुम्ही मारले. अशा छळाने मुलगा हाय घेऊन मरायचा हो एखादा !
हरदयाळ : कसला मरतो ! देवाला तरी चांगलीच मुले आवडतात. असली विधुळी पोरे कोणाला आवडतील ? तो छळायला आला आहे, कुळाचे नाव बुडवायला आला आहे. काही खायला देत नाही. आज मार खाल्ला आहे तेवढे पुरे खाणे ! रोज खायचे आहेच. एक दिवस न खाल्लाने थोडाच मरणार आहे ?
दादू : मुलाबाळांवर तरी प्रेम करा !
हरदयाळ : मुलाबाळांचे खोटे लाड करणे आम्हा हिंदूंना माहीत नाही ! आम्हाला गुण प्रिय आहेत. अक्कल प्रिय आहे. पोरे प्रिय नाहीत!
दादू : हरदयाळ, सबसे अक्कल बडी है, ऐसे मत समझो. सफा दिल यही सबसे ब़डी चीज है ! दिल सफा होना. शशी कैसा नेक लडका है, कैसा पाक बच्चा है; जैसा अस्मान का तारा, दूधके ऊपर का फेस. बिलकुल अच्छा बच्चा ! उसको प्यार करो हरदयाळ, प्यार करो भाई !
दादू निघून गेला. हरदयाळ व त्याची आई शशीला शोधू लागली. शशीच्या आईला सारखे वाईट वाटत होते, किती झाले तरी मातृहृदय ते ! पण क्रोधी पतीपुढे तिचे काय चालणार ? दोघे शशीला धुंडू लागली. विहिरीत तर नाही ना पोराने उडी घेतली, असा भयंकर विचार शशीच्या आईच्या डोक्यात येऊन गेला. ती घाबरली. परंतु इतक्यात तिला गायीचा गोठा आठवला. “गोठ्यात बघा बरं ! त्याला गाय फार आवडते तो वासराबरोबर खेळतो.” हरदयाळ दिवा घेऊन गोठ्यात गेले, तो तेथे वासराजवळच गवतावर गुरगुंटी करून झोपी गेलेला बाळ शशी त्यांना दिसला. बापाने मुलाला हालविले. “ऊठ रे, घरात चल. उठ” हरदयाळ बोलले.