मोलकरीण 4
केव्हा एकदा वडील जातात असे बाळाला झाले होते. ढोपरपंचा नेसलेल्या, बाराबंदी घातलेल्या, खांद्यावर पडशी घेतलेल्या त्या जडपुराण्या बापाशेजारी उभे राहावयास तो लाजत होता. बापाजवळ उभे राहण्यात त्याला भयंकर अपमान वाटत होता. वडील गेले व सारी मुले खो खो करून हसू लागली.
“केवढी रे, ती पडशी! जशी गाढवाच्या पाठीवरची गोणी! आणि डोक्यावर तो पागोट्याचा मणाचा बोजा! आणि विचारी कसे म्हातारा,’ आमचा बाळ राहतो का येथे?’ जसे घरच त्याचे! गावंढळांना जरा चालरीत म्हणून नाही? कोठे कसे वागावे याची अक्कल नाही. मूर्ख पढतमूर्ख! त्यांनी श्राद्धपक्षाला जावे, खीर भुरकावी, दक्षिणा कनवटीस लावावी, दुसरे काय?”
इतक्यात एक मुलगा म्हणाला, “अरे, तूसुद्धा भटजी व्हायचेस! रोज नवीन, पक्वान, विडा चघळायला, दक्षिणा कमरेला! कशाला रे इंग्रजी शिकतोस? चांगली तुळतुळीत हजामत करावी, हातभर शेंडी ठेवावी, मोठ्यामोठ्या मिश्या राखाव्या. लठ्ठ, वजनदार प्रतिष्ठित पागोटे घालावे! कोणीची उदकशांत, कोणाची ऋतुशांत, कोणाचे बारसे, कोणाचा बारावा! फसलास बाळ्या, तू! तो वेद घोकला असतास तर किती चांगले झाले असते!”
दुसरा एकजण म्हणाला, “एवढे वेद कसा पाठ करतात देव जाणे! एक कविता पाठ करणे म्हणजे माझ्या कोण जिवावर येते! आणि प्रयत्नाने आज पाठ केली तरी उद्या विस्मृती ठेवलेलीच!”
तिसरा म्हणाला, “अरे, असे डोक्यात कोंबणे म्हणजे काही बुद्धीचा विकास नव्हे.”
तिसरा म्हणाला, “अरे, आपल्याला सतरा विषय! लक्षात तरी काय काय ठेवावयाचे?”
परंतु तत्त्वाची गाठ घेणारा एक मुलगा म्हणाला, “अरे, चर्चा थांबवा. बाळाची पुरचुंडी आधी सोडा बघू.”
सारेजण कबूल झाले. पुरचुंडी सोडण्यात आली तो आत नारळीपाकाच्या वड्या! “कोणाच्या तरी लग्नमुंजीतील नारळ असतील; नाही तर सत्यनारायण, ग्रहमख-कशातले रे बाळ्या?” असे कोणी तरी विचारले. मुलांनी वड्यांचा तेव्हाच फन्ना केला. “आणि ती लहान पुडी रे कसली?” असे म्हणून एकाने ती बाळाच्या हातातून हिसकावून घेतली.
पुडीत पाहातात तो ती राख, चिमुटभर भुरी! “अरे हे भस्म की काय? संध्या करताना तोंडाला-कपाळाला फासायची पावडर! बाळ्या, इतके भस्म रे कसे पुरेल? एका वेळेच्या संध्येलाही ते पुरणार नाही. पाठवायचे तर एक मोठा रांजण तरी भरून पाठवायचा की नाही?” बाळाच्या वडिलांचे शब्द ऐकलेला एक मुलगा म्हणाला, “हा अंगारा आहे. बाळाच्या आईने पाठविले आहे. अंगारा लावून का रे पहिला नंबर मिळवतोस? तरी म्हटले, बाळ्या एवढ्या हुशार कसा? ह्या हुशारीच्या मुळाशी आंबाबाई असेल हे नव्हते आम्हाला माहीत. या रे, आपणही सारे अंगारा लावू.”
जय देवी जय देवी अंबाबाई।
पहिला नंबर देई सर्वां लवलाही।।
अशी आरती करीत मुले नाचू लागली. एका मुलाने येऊन तो आंगारा फुंकारून दिला.
ठण्-ठण्-ठण् भोजनाची घंटा झाली. “घंटा झाली, माझा गृहपाठ अजून राहिलाच आहे-” एकजण म्हणाला, “घंटा झाली, माझा साराच अभ्यास राहिला आहे-” दुसरा म्हणाला, “अरे, अंगारा लावला आहेस ना मग लेका, आता काळजी कशाला? चला सुखाने पोटभर जेवू-” तिसरा म्हणाला.