शशी 21
शशीने मधूला उचलून दूर ठेवले व तो फिरून मुंग्यांची गंमत बघू लागला. इतक्यात पार्वतीबाईंनी घरातून कढतकढत राख आणून मुंग्यांवर ओतली ! मुंग्या होरपळून जाऊ लागल्या ! शशी म्हणाला, “आई, हे गं काय ? आई, जळल्या की गं त्या !” शशी त्या राखेतून मुंग्यांना सोडवू लागला. परंतु तो किती सोडवणार ? पार्वतीबाईंनी पुनः निखारे आणून ओतले. शशी रडू लागला. काय करावे ते त्याला सुचेना. शेवटी त्याला एक युक्ती सुचली. त्याने तांब्याभर पाणी आणले व त्या निखा-यांवर ओतले. निखारे विझले. आगीतून वाचलेल्या मुंग्या पाण्यात वाहून जाऊ लागल्या! शशीची दया व आईचा क्रोध- दोहोंमुळेही त्या मुंग्याना मोक्षच मिळत होता !
आई : शश्या, कार्ट्या, हे काय केलेस ? ही सारी राड झाली की, भर ती सारी घाण. छळायला आला आहेस आईला !
शशी : आई, मी गं काय छळले तुला ? त्या मुंग्या जळत होत्या ते माझ्याने बघवेना.
आई : मोठा उदार ! बघवत नव्हते तर धिंडका बाहेर का नाही गेली ?
शशी : आई, देव रागावणार नाही का ?
आई : काही नाही रागावणार. मुंग्यांना बाहेर जागा थोडी का आहे ? त्यांची वारुळे आहेत, तरी पण येथे येतील सतवायला.
शशी : आपले घर त्यांना आवडत असेल !
आई : मला संतापवू नकोस असले बोलून. चालता हो येथून ! छळवादी कुठला !
शशी : आई, नको गं असे बोलू ! मी नको का तुला ?
आई : तू नकोस मला ! मला मधूच आवडतो.
शशीचो तोंड गोरेमोरे झाले. तो बाहेर गेला. तो कोठे गेला ? तो नदीवर गेला. नदी म्हणजे परमेश्वराची वहाती करुणा ! शशी नदीवर जाऊन बसला. शशीच्या डोळ्यांतील गंगा-यमुना त्या नदीत मिळत होत्या. तेथे त्रिवेणीसंगम झाला होता.
इतक्यात आकाशात ढग आले. मोठा पाऊस येणार असे वाटू लागले. वारा सुटला, पाखरे धावपळ करू लागली. मोर मात्र नाचू लागले. शशी उठला. शशी पावसात नाचू लागला. झाडे माना डोलावीत होती, मोर नाचत होते, वारा खेळत होता. त्याच्याबरोबर शशी पण नाचू-खेळू लागला.
मेघ निघून गेले. अस्तास जाणारा सूर्य डोकावला. किती सुंदर दिसत होती संध्या ! शशी तो देखावा पाहात राहिला. नाना रंग, नाना आकार ! काळ्या मेघांना सोनेरी किनार काय छान दिसल होती ! जणू जरीच्या वस्त्रांचा कारखानाच वरती चालला होता ! का कोणा राजराजेश्वराचा जामदारखाना उघडला होता ? सकल ब्रह्मांडाचा धनी-त्याचे वैभव होते ते.