शशी 17
शशी : आई, एक माझ्या अमीनला नेऊन देईन, अमीनचा आई अमीनबरोबर माझ्यासाठी खाऊ पाठविते, तू नाही माझ्या मित्राला देणार? अमीन चांगला आहे, मास्तरांनी मला मारले तर तो रडू लागतो.
आई : तुला त्यांनी शंभरदा बजावले, की अमीनची संगत सोड म्हणून! अगदीच कसे सांगितलेले ऐकत नाहीस! इतका कसा बावचळलास!
शशी : आई, नेऊ का!
आई : नाही न्यायचे. पुनःपुन्हा फाजीलपणाने रे काय विचारतोस!
शशी : मग मला नकोच ही बिस्किटे!
आई : माजलास होय कार्ट्या! बघ तुला कधी फिरून देईन का! फेकून दिलीस का ती सोन्यासारखी बिस्किटे ! दांडोबा नुसता !
शशी : मी आता कधी खाऊ नाहीच मागणार! माझ्या एकट्यासाठी मला कशाला?
पाटीदप्तर घेऊन शशी शाळेत गेला. कवितांचा तास होता. गुरुदेव कविता शिकवीत होते.
फार खाऊ नये। पाहिले ते मागू नये
गोड भांडण कधी करू नये। शिवी कोणा देऊ नये।।
गुरुजी : तू खातोस की नाही रे, वामन्या गोड गोड?
वामन : मला गूळ मुळीच आवडत नाही. तो बोटांना चिकटतो.
शशी : त्या गुळावर माश्या किती बसतात! मला गोड आंबा आवडतो. अमीनकडचा गोड आंबा मला आवडतो.
गुरुजी : आंब्याचा वीट येत नाही. येथे गोड म्हणजे आंबा नव्हे, तर बर्फी, पेढे, लाडू, साखर, गूळ वगैरे. लख्या, नखे काय खातोस! गद्ध्या, गोड खा; परंतु नखे नको खाऊ! पुढे काय आहे!
‘शिवी कोणा देऊ नये’
ए अमीन, लक्ष कोठे आहे गाढवा? बाहेर काय बघतोस?