Get it on Google Play
Download on the App Store

मोलकरीण 12

राधाबाई म्हणाल्या, “एकदा नातवाला तरी पाहून येऊच. मी त्याला मांडीवर घेईन, न्हाऊ घालीन; तुम्हीही पाहाल, दोन दिवस राहू आणि येऊ. मी बाळाला नऊ महिने पोटात वाढविला, त्याचा भार रात्रंदिवस प्रेमाने वाहिला. तुम्हाला दोन दिवस थोडी दगदग नाही का सहन करवत ? आपल्या बाळासाठी जन्मभर खेपा घातल्यात. पायांना विश्रांती दिली नाहीत; मग आता का बरे असे ? जीवन जात चालले म्हणजे का प्रेमही अस्तास जाऊ लागते ? खरेच सांगते, की नाही म्हणू नका.”

गोविंदभटजींनी रुकार दिला. राधाबाईंनी काही खाऊ बरोबर घेतला, काजूगर, आंब्याफणसाची साठी, आवळ्याच्या वड्या, चांगले वरंगळाचे पोहे, उडदाचे पापड, वालाची डाळ-जे घेता येईल ते त्यांनी बरोबर घेतले, गोविंदभटजींची पडशी पुनः सजली. आपले ते गाव सोडून ते वृद्ध जोडपे बाळाला पाहण्यासाठी निघाले.

बोटीमध्ये त्या उभयतांनी तोंडात पाणीही घातले नाही. मुंबईत धक्क्यावर उतरल्यावर नळावर त्यांनी स्नान केले. गोविंदभटजींनी बाजूला थोडी संध्या केली. नंतर थोडा फलाहार करून ती पिकली पाने गाडीत बसून बोरीबंदरावर आली. तेथे कोण गर्दी ! तिकिट कोठे काढायचे तेही माहीत नाही. याला विचार त्याला विचार, सुधे उत्तर कोण देणार ? सारे सहानुभूतिशून्य पशू ! ओलावा नसलेले दगड !

शेवटी एकदाचे तिकीट-ऑफीस सापडले. तेथे कोण धक्काबुक्की व रेटारेटी ! गोविंदभटजींनी पागोटे राधाबाईंजवळ ठेविले व ते त्या गर्दीत घुसले. वृद्धाला सवलत द्यावी हा दंडक आमच्याकडे नाही. सारे समानतेचे भोक्ते ! “म्हाता-या, पुढे हो,” पाठीमागचे मगरूर प्राणी ओरडत. पैशांची पुरचुंडी लवकर सुटेना. “आटप म्हाता-या ! काढ की पैसे !” तिकिट देणारा ओरडला.

एकदाची तिकिटे काढून गोविंदभटजी बाहेर आले. बाळासाहेब व मालती-त्यांना फर्स्टक्लास असे; परंतु गोविंदभटजींना इतके सुख पचले का असते ? कोणी दिलेही असते तरी त्यांच्याने ते उपभोगवले असते का ?

एक हमाल म्हणाला, “म्हाता-या घेऊ का रे ?” गोविंदभटजी म्हणाले, “अरे, मी जन्मभर हमाली केली आहे. मला रे कशाला हमाल ? ही पडशी मी सदैव खांद्यावर बाळगली. ती काही आजच मला जड नाही झाली. ही प्रेमळ पडशी मला सोडणार नाही. देहाची खोळ आणि ही कापसाची खोळ एकाच वेळेस गळून पडतील. तोपर्यंत हा गोविंदभट त्यांना सांभळील.” गाडी सुरू झाली. गोविंदभट विष्णुसहस्रनाम म्हणत होते. वाटेत एका स्टेशनवर त्यांनी थोडी संध्या केली; परंतु त्याना डबा पटकन सापडेना. “कोठे आहेस गं ए ? आगं, कोठे आहेस ?-” असे गोविंदभटजी ओरडू लागले, “ही मी येथे आहे. चढा झटकन खिडकीतून तोंड काढून राधाबाई सांगू लागल्या.”

शेवटी एकदाची उमरावती आली. उभयतांनी अन्नाला स्पर्श केला नव्हता. केळी-संत्री यांच्यावरच वेळ गेली होती. दोघांचा जीव भुकेला होता. परंतु अन्नापेक्षा बाळाचा मुखचंद्र पाहण्याचीच भूक त्यांना अधिक होती. “घरी जाऊन आधी बाळाला पाहू, नातू पाहू-” असे राधाबाई म्हणाल्या.

नळावर तोंड वगैरे धुऊन दोघे बाहेर आली. गाडीवाल्यांची गर्दी ब्राह्मणाभोवती झाली. हा ओढी, तो ओढी. गोविंदभटजी संतापले. “हात तर लावा पुनः पडशीला ! व्हा दूर !- ते शब्द ऐकून गाडी हाकणारे दूर झाले. परंतु मिष्किलपणे हसू लागले. शेवटी एका गाडीवाल्याला गोविंदभटजी म्हणाले, “आम्हाला बाळासाहेबांकडे घेऊन जाशील का ?”

विश्राम

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
विश्राम 1 विश्राम 2 विश्राम 3 विश्राम 4 विश्राम 5 विश्राम 6 विश्राम 7 विश्राम 8 विश्राम 9 विश्राम 10 श्यामची आत्या 1 श्यामची आत्या 2 श्यामची आत्या 3 श्यामची आत्या 4 श्यामची आत्या 5 श्यामची आत्या 6 श्यामची आत्या 7 श्यामची आत्या 8 शशी 1 शशी 2 शशी 3 शशी 4 शशी 5 शशी 6 शशी 7 शशी 8 शशी 9 शशी 10 शशी 11 शशी 12 शशी 13 शशी 14 शशी 15 शशी 16 शशी 17 शशी 18 शशी 19 शशी 20 शशी 21 शशी 22 शशी 23 शशी 24 शशी 25 शशी 26 शशी 27 शशी 28 शशी 29 शशी 30 शशी 31 शशी 32 शशी 33 शशी 34 शशी 35 शशी 36 शशी 37 शशी 38 मोलकरीण 1 मोलकरीण 2 मोलकरीण 3 मोलकरीण 4 मोलकरीण 5 मोलकरीण 6 मोलकरीण 7 मोलकरीण 8 मोलकरीण 9 मोलकरीण 10 मोलकरीण 11 मोलकरीण 12 मोलकरीण 13 मोलकरीण 14 मोलकरीण 15 मोलकरीण 16 मोलकरीण 17 मोलकरीण 18 मोलकरीण 19 मोलकरीण 20 मोलकरीण 21 मोलकरीण 22 मोलकरीण 23 मोलकरीण 24 मोलकरीण 25 मोलकरीण 26 मोलकरीण 27 मोलकरीण 28 मोलकरीण 29