श्यामची आत्या 2
रामचंद्रपंतांची इस्टेट खूप होती. परंतु त्यांचा स्वभाव पडला उठाठेवी. नेहमी कज्जेदलाली चालावयाची. उठल्या-बसल्या फिर्यादी-अर्यादी सुरूच असावयाच्या. कोकणातील लोक भांडखोर फार. सदैव कोर्टकचे-या व चैनच पडत नाही ! अफू-गांजासारखे व्यसनच ते !
रामचंद्रपंतांचे भाऊबंद पुष्कळ म्हणून भाऊबंदकी फार. या भाऊबंदकीपायी त्यांना पुष्कळ कर्ज झाले. कज्जेदलालीमुळे बागेचे उत्पन्न येई ते पुरे पडेनासे झाले. कर्ज वाढत चालले. काही कर्ज भाऊबंदांचेच होते, त्यांनी काही फिर्यादी केल्या. रामचंद्रपंतांच्या बागेचा लिलाव झाला. इतर शेतीवाडीही हळूहळू गेली. फक्त त्यांचे राहते घर राहिले. रामचंद्रपंतांस आता कोणी पूर्वीप्रमाणे मान देईना. इतके झाले तरी त्यांची कज्जेदलाली काही कमी झाली नाही.
सीताआत्याला आता गरिबी आली. तिच्या हातातल्या गोठपाटल्या गेल्या. मणिमंगळसूत्राशिवाय अंगावर सोने राहिले नाही. तिची हजाराची नथ सावकराच्या घरी गेली, कानातील करवंदाएवढाल्या मोत्यांच्या कुड्या गेल्या. कानाची भोके मात्र राहिली! गडी माणसे नाहीशी झाली, दीरनणंदा कोणी आता तिला विचारीतना. सारे सुखाचे सांगाती, दुःखाचे कोणी नाही! ज्या दिराला त्यांनी शिकविले, तो दीरही कधी त्यांची वास्तपुस्त घेत नसे. तो तिकडे व-हाड खानदेशात वकील झाला होता व फावड्यांनी पैसे मिळवीत होता! परंतु पाच रुपये पाठवील तर शपथ! या जगात कृतज्ञतेऐवजी कृतघ्नताच फार आहे का?
सीताआत्याच्या माहेरालाही पूर्वीची कळा राहिली नाही. तिचे चार भाऊ आता निरनिराळे झाले. प्रत्येकाचा सवता सुभा, सवता संसार ! त्यांच्यातही कज्जे-कैफियत सुरू झाल्या. पूर्वीप्रमाणे ते श्रीमंत राहिले नाहीत. अशा रीतीने सीताआत्याच्या माहेरी व सासरी दोहोंकडे दारिद्र्य आले. तिला कोठेही आधार दिसेना.
नाही म्हणावयास सीताआत्याचे घर अजून राहिले होते. परंतु रामचंद्रपंतांच्या उपद्व्यापी स्वभावामुळे आणखी कर्ज काढून ते कोर्टकचेरी करीतच होते. त्यामुळे शेवटी ते राहते घरही जप्त झाले. सावकराच्या दयेने घराची ओसरी व पडवी त्यांना राहावयास मिळाली व सीताआत्या आणि रामचंद्रपंत ही आता तेथेच राहीत होती.
कमरेवर घागर-कळशी घेऊन सीताआत्याला स्वतः पाणी आणावे लागे, झाडलोट, सडासारवण, पाणीउदक, धुणे-सारी कामे तिलाच करावी लागत. तिला या कष्टाची सवय नव्हती. ती सुखात वाढलेली परंतु हळूहळू तिला शिकावे लागले. संकटे मनुष्यास सर्व काही शिकवितात. आपत्ती हा जगातील सर्वात मोठा गुरू होय.