शशी 12
“बरे, हरदयाळ, मी जातो,माफ करा. तुमच्या गुणी मुलाला मारूबिरू नका.” असे म्हणून दादू निघून गेला.
“शश्या, अमीनकडे परत कधी गेलास तर तंगडे मोडून टाकीन ! समजलास ! दुसरी मुले का थोडी आहेत ? तो वामन आहे, तो लखू आहे, त्यांच्याशी मैत्री का नाही करीत ? तुला का घर बाटवायचे आहे ? जवळचे मित्र सोडून जातो तिकडे, त्या मुसंड्याकडे. त्या अमीनचे नाव सोडून दे, ऐकलेस?” हरदयाळ अद्याप रागातच होते.
“बाबा, तो वामन खोटे बोलणारा आहे. त्या दिवशी अमीनची पेन्सिल त्यानेच घेतली अन् ‘नाही’ म्हणाला. तो लखू वाटेल तशा शिव्या देतो ? आणि त्याचे दात किती घाणेरडे असतात ! मला नकोत ते मित्र, मास्तरांनी मला मारले तर मी एकटा राहीन.” शशी दु:खाने व रडक्या आवाजात म्हणाला.
“पाय धुवा आता. जेवायचे केव्हापासून झाले आहे. निवून गेले सारे.” घरातून पार्वतीबाई म्हणाल्या.
शशी दोन घास खाऊ अंथरुणावर पडला. त्याच्या कानांवर आईबापांचा पुढील संवाद येत होताः
“या पोराचे लक्षण काही ठीक नाही,” हरदयाळ म्हणाले. “अजून लहान आहे. लहानपणी हट्टी पोरे पुढे निवळतात.” पार्वतीबाई म्हणाला.
हरदयाळ म्हणाले, ‘अगं नुसता हट्टीच नाही. हा त्या मुसलमानाकडे जातो. उद्या महारमांगाकडे जायचा ! हा भ्रष्टाचार फार वाईट. कुळाला काळिमा लागायचा !”
आई-बापांची बोलणी ऐकून शशीला अंथरुणात रडू आले. परंतु त्याचे ते दीन, पवित्र अश्रू पुसायला जगात अमीनशिवाय कोण होते ?
एके दिवशी सायंकाळी शशी शाळा सुटल्यावर घरी आला होता. शशीची आई त्याला म्हणाली, “शशी, गुराखी गाय आणून सोडील, ती नीट बांधून ठेव. नाही तर वासरू सारे दूध पिईल हो ! मी विहिरीवरून चार खेपा आणत्ये. लक्ष ठेव.” आई पाण्यासाठी गेली. शशी गायीची वाट पाहात होता. “गाय आली हो वैनी,” असे बोलून गुराख्याने गाय अंगणात सोडली. इतर गायी घेऊन तो पुढे गेला. गाय एकदम गोठ्यात घुसली व वासराजवळ उभी राहिली. गायीला तटतटून पान्हा फुटला. वासरू दूध पिऊ लागले. गाय प्रेमाने त्याचे अंग चाटू लागली.