विश्राम 1
दिनकरराव म्हणून एक जमीनदार होते. ते सावकारीही करीत असत. घरी भरपूर पैसा होता. शेतीवाडी पुष्कळ होती. गाईगुरांचे मोठे खिल्लार होते. त्यांच्याजवळ ते सारे होते; फक्त एकच गोष्ट त्यांच्यापाशी नव्हती. थोर व उदार हृदय-त्याची देणगी मात्र त्यांच्यापाशी नव्हती. ते अनुदार होते, कृपण होते. गरिबांच्या कधी उपयोगी पडत नसत. दुस-यांच्या जीवनाची कल्पना त्यांना कधी येतच नसे. ते केवळ स्वतःपुरते पाहणारे होते.
त्यांच्या घरी विश्राम म्हणून एक गडी होता. विश्रामला दिवसभर त्यांचे काम करावे लागे. काम करून तो थकून जाई. तो गुरांचे दूध काढी, गोठा झाडी, लाकडे फोडी, धुणी धुई, भांडी घाशी, शेतात खत वाही. सारा दिवस काम. रात्री नऊ वाजता तो घरी जाई. दिनकररावांकडे तो जेवूनखाऊन होता. जेवूनखाऊन वर्षाला तीस रुपये ते देत. त्याला जेवायला शिळेपाके वाढीत, पोटभर जेवणही त्याला मिळत नसे.
विश्रामच्या घरी त्याचा म्हातारा बाप होता. तो अजूनही मोलमजुरी करीत असे. विश्राम रात्री घरी आला म्हणजे बाप त्याला म्हणे, “दमतोस हो पोरा. गरीब बापाच्या पोटी आलास, खपून खावे लागते. काय करायचे?” बापाचे असे शब्द ऐकून विश्रामला वाईट वाटे. तो म्हणे, “बाबा, तुमचा गोड शब्द ऐकला की सारा थकवा जातो. तुमचे वय झाले, तरी तुम्हाला मजुरी करावी लागते. माझा पगार मालकाने थोडा वाढविला तर तुम्हाला अशा म्हातारपणी काम करावे लागणार नाही; परंतु आहे तोच पगार मालक कमी करू बघत आहे! बाबा, बाबा, मुंबईस जाऊ का? मिलमध्ये मिळेल नोकरी- दोन दिडक्या जास्त मिळतील. तुम्हाला पाठवीन.” विश्रामचे बोलणे ऐकून म्हातारा म्हणे, “नको रे बाबा, मिलबिल नको हो! अरे, इथली मोकळी हवा, हे अंगण, ही शेतेभाते, गाईगुरे-हे शहरात पाहायला मिळेल का? तेथे ना जागा, ना प्रेमाचे कोणी. दोन घंटे काम जास्त करू, पण येथेच राहू. शहर नको. माझी शपथ आहे विश्राम, तुला. तुम्ही दोघे येथेच राहा. सगुणा पोर मोठी चांगली आहे. शहरात नेऊन तिची माती नको करू. शहरात गरिबाला अब्रूने राहाणे कठीण. नाना व्यसने, नाना प्रकारचे लोक तेथे. येथेच कोंड्याचा मांडा करून खावा, टिळ्याटाकळ्याची भाजी करावी, पण शहर नको.” म्हातारा विश्रामकडून कबूल करून घ्यायचा,
विश्रामची बायको सगुणा. तीही दळणकांडण करायला जाई. विश्रामच्याच मालकाकडे तिला दळणकांडण करायला जावे लागे. तेथे जाणे तिला आवडत नसे. पण विश्रामवर धन्याचा राग होऊ नये म्हणून ती जाई. सगुणा सकाळी उठून झाडलोट करी, नंतर भाकर करी. म्हाता-याला खायला देई. विश्राम थोडी खाई. नंतर सारी कामाला जात. अजून सगुणाला मूलबाळ नव्हते. कुटुंब लहान होते; तरी विश्रामचे ते तीस रुपये-वर्षाचे तीस रुपये किती पुरणार?