शशी 23
शशी घरी आला. त्याला स्वतःचे घर आज वाघाची दरी वाटत होते ! तो सुकून गेला होता. त्याला अत्यंत वाईट वाटत होत. माराने त्याचे अंग दुखत होते. खोट्या आरोपाने त्याचे निर्मळ हृदय दुःखी झाले होते. शशी आईला म्हणाला, “आई, आज मला बरे वाटत नाही. मी निजतो. मला जेवायला नको.” शशी अंथरुणावर जाऊन पडला. घरात दिवे लागले. शशीचा बाप बाहेरून आला. “का आज शश्या लवकरसा निजला ?” त्यांनी विचारले. शशीची आई म्हणाली, “बरे वाटत नाही म्हणाला. भूक नाही म्हणतो. हिंडतात, उन्हातान्हातून, पाणी पितात; नसेल भूक, निजू दे.”
हरदयाळ पाय धुण्यास जाणार तोच शेजारच्या वामनने चिठ्ठी आणून दिली. हरदयाळांनी ती चिठ्ठी वाचली; आणि मग काय विचारता ! आधीच ते म्हणजे जमदग्रीचा अवतार. हरदयाळांनी शशीबाळाच्या कमरेत लाथ मारली व ते ओरडले, “ऊठ, हरामखोरा ! ढोंगी कारटा ! येथपर्यंत तुझी मजल आली का ? फीच्या पैशातून वड्या घेतल्यास ? घरी का खायला मिळत नाही ? बोल, वड्या घेतल्यास की नाही ? बोल, आता तुला मरेमरेतो चेचतो.”
हरदयाळ शशीला गुराप्रमाणे मारीत होते. तो केविलवाणा पोर एकच म्हणत होता, “बाबा, मी नाही वड्या खाल्ल्या. का मला मारता ? मारा, काही करा. मी मास्तरांना फी दिली होती. बाबा, नका हो मारू.”
“नका मारू ? फी कोठे आहे ? मास्तर का खोटे बोलतात ? जा, घरातून चालता हो. नीघ-” असे म्हणून हरदयाळांनी शशीला मारीत दाराबाहेर नेले. शशीला बाहेर ढकलून त्यांनी दार लावून घेतले.
बिचारा शशी ! तो अंगणात रडत होता. किती रडणार ? त्याचे अश्रू कोण पुसणार ? आकाशात ढग आले. एकाएकी ढग आले व पावसाचे थेंब पडू लागले. आकाश का रडत होते ? शशीसाठी तारे-वारे-आकाश सारीच सृष्टी रडू लागली ! आकाशातील ढग गेले. तारे अश्रूप्रमाणे आकाशात थऱथऱत होते. शशीने हात जोडले व तो म्हणाला, “देवा, कोठे रे आहेस तू ? तू प्रल्हादासाठी खांबातून बाहेर आलास, मग माझ्यासाठी रे का नाहीस येत ? का नाहीस बाबांना सांगत, की शशीने पैसे खाल्ले नाहीत म्हणून ? मी पैसे खाल्ले नसतानाही का रे सारे मला मारतात ? देवा, तू ये न् मला घरी ने-तुझ्या घरी ने.”
शशी आकाशाकडे पाही व पुनःपुन्हा हात जोडी. तो पाहा, तो एक तारा एकदम तुटला. तेजाची रेषा दिसली. शशीला वाटले, “तो तारा माझ्या वडिलांस खरी गोष्ट सांगेल.” शशी दार उघडेल म्हणून वाट पाहात होता. परंतु दार उघडले नाही. “काय देवालाही दया नाही?” शशी मनात म्हणाला.
शशीला अंगणात भीती वाटू लागली. तो गायीच्या गोठ्यात गेला. तेथे तांबू होती. शशी तांबूसमोर उभा राहिला. तांबू त्याचे अंग चाटू लागली. अंगावरच्या वळांवर आपल्या जिभेने ती अमृतांजन लावू लागली! शशीचे अंग माराने हिरवे-नीळे झाले होते. कोण तेल लावणार? कोण मलम लावणार? तुरुंगात फटके मारल्यावर पट्टी तरी बांधतात; परंतु या घरच्या तुरुंगात तेवढेही नाही! गाय चाटू लागली व शशीला हुंदका आला. तो म्हणाला, “तांबू! तू तरी माझी आई हो. गोमाता तू. चाट माझी मांडी चाट. तांबू, तुझ्या वासरासारखाच मी!”