मोलकरीण 7
बाळ पुण्यास शिकत होता, पण राधाबाईंचे चित्त बाळाच्या स्मृतिसागरात सदैव डुंबत असे. मुलासाठी त्या देवाला आळवीत, प्रार्थीत. त्या प्रदक्षिणा घालीत, जप करीत. घरी कधी चांगली भाजी झाली तर चटकन् त्यांना बाळाची आठवण येई व चटकन् डोळ्यांना पाणी येई. त्या दुखा:ने म्हणत, “माझा बाळ खानावळीतले कदान्न कसेतरी खात असेल!” कधी उचकी लागली, घास खाली पडला, जीभ चावली गेली, तर “बाळाने बहुधा आठवण काढली असेल?” असे त्या म्हणायच्या. बाळाचा जप आई करीत होती, परंतु बाळाला आईचे स्मरण करावयास वेळ कोठे होता? त्याला किती अभ्यास, किती अपॉइंचमेंट्स, किती लाइट व हेव्ही फीस्टस्, किती टेनिसचे सेट्स, किती प्रेमभेटी व किती अनुरागसंवाद!
गोविंदभटजी वणवण हिंडून बाळाला पैसे पाठवीत होते. राधाबाई घरी बसून देवाला आळवीत होत्या. बाळ तिकडे मजा मारीत होता!
बाळ लवकर विलायतेस आय. सीय एस. च्या अभ्यासाठी जाणार होता. त्या दिवशी बाळ व मालती फिरावयास गेला होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघे स्तब्ध बसली होती, थंडगार वारा वाहत होता. आजूबाजूला अंधार भरू लागला होता. बाळ व मालती दोघे खूप दूर गेलेली होती. आजूबाजूला कोणी नव्हते. वरून तारे त्यांच्याकडे पाहू लागले. अंधार त्यांच्याकडे पाहू लागला. अंधारात त्यांच्या प्रेमाचा प्रकाश शब्दद्वारा प्रकट होऊ लागला.
मालती : तुमचे माझ्यावर खरेच प्रेम आहे ?
बाळ : हो.
मालती : कशावरून ?
बाळ : आपण इतका वेळ मुकाट्याने बसलो होतो यावरून.
मालती : तुम्ही विलायतेस जाणार; मला विसणार नाही ?
बाळ : कसा विसरेन ?
मालती : पुरुषांना सदैव नवीन नवीन आवडते असे म्हणतात.
बाळ : एकाच वस्तूचे अनंत रंग ते पाहतात. एकाच व्यक्तीतील नवीन नवीन माधुरी ते चाखतात. खरे प्रेम विटत नाही. ख-या प्रेमाला प्रिय वस्तू सदैव नवीनच दिसते. तो सूर्योदय व सूर्यास्त पाहून कधी कंटाळतो का ? माणसाला नवीन आवडते ही गोष्ट खरी; परंतु ही नवीनता त्याच वस्तूंत सदैव अनुभविण्याची शक्ती प्रेमात असते. ज्या प्रेमात ही शक्ती नाही, ते प्रेम आसक्ती होय. मला तू सदैव नवीनच दिसशील. मी सात हजार मैलांवरून प्रेमाची दुर्बीण लावून तुझ्याकडे पाहीन. तुझ्या मुखचंद्राचे संशोधन करीन, हृदयसिंधूत डोकावीन, नवीन नवीन शोध लावीन.
मालती : पुरुष खूप गप्पा मारतात.
बाळ : ते आतल्या गाठीचे नसतात, मोकळेपणे बोलतात. हृदयातील ओकतात. तुम्ही स्त्रिया गूढ असता, खोल असता.
मालती : मला नेहमी पत्र पाठवा, मी वाट पाहात राहीन. दुसरे पत्र मिळेपर्यंत पहिले पत्र वाचावयास पुरले पाहिजे, एवढे मोठे पत्र नेहमी लिहीत जा.
बाळ : म्हणजे दर आठा दिवशी मला एक कादंबरीच लिहून पाठवावी लागेल ! मग अभ्यास केव्हा करू ?
मालती : मनात असले म्हणजे लिहावयास वेळ लागत नाही.