शशी 2
“कोठे आहे रे पेन्सिल ? हरवलीस गाढवा ! तरीच शाळेत जात नव्हतास, हरवशील का पुन्हा ? हरवशील- ?” असे म्हणून शशीच्या कोमल गालावर हरदयाळांनी पाची बोटे उमटविली.
“नका हो बाबा मारू ! नका ना- !” शशी रडू लागला.
त्या लहान बालकाच्या डोळ्यांतून निष्पाप अश्रू गळू लागले. शशी गोजिरवाणा शशी. त्याचे ते गाल फुलांसारखे वाटत असत. कधी कधी फुलपाखरे शशीच्या गालांवर येऊन बसत व शशी प्रेमाने डोळे मिटी, असे ते शशीचे गाल बापाने मारून लाल केले. ते गाल अश्रूंनी ओले झाले.
शशी मुसमुसत म्हणाला, “बाबा, मी पेन्सिल हरवली नाही. खरंच नाही हरवली. अमिनला लिहावयाला नव्हती. त्याला कोणी देईना. त्याला मी दिली. त्याला सारी मुले चिडवतात. ‘मुसंड्या’ असे म्हणतात. अमीनला मी माझी पेन्सिल दिली. माझ्याजवळ एक लहानसा तुकडा होता. परंतु तो मात्र हरवला. कालची पेन्सिल अमीनजवळ आहे.”
“मग त्याच्याजवळून घेऊन ये. म्हणे अमीनला दिली ! मोठा बाजीरावाचा बेटाच पडलास की नाही ! आज पेन्सिल दिलीस उद्या अंगातला कोट देशील ! तू सा-या घराचे वाटोळे करशील, कुबेराला भिकेला लावशील ! अगदी अक्कल नाही तुला काडीचीही. शाळा सुटताना पेन्सिल घेऊन ये, समजलास ?” हरदयाळांनी बजाविले.
“बाबा ! दिलेली पेन्सिल परत कशी घेऊ ? दिले दान, घेतले दान, पुढल्या जन्मी मुसलमान ! बाबा ! मी मग मुसलमान होईन. तुम्हाला तर मुसलमान मुळीच आवडत नाही- !” शशीने शंका विचारली.
“फाजीलपणाने बोलायला सांगा. ते मला काही एक माहीत नाही. पेन्सिल घेऊन घरी आलास तर ठीक आहे, नाही तर याद राख ! आणि त्या अमिनफिमीनशी संबंध ठेवू नकोस. दुसरी मुले का थोडी आहेत ? घे ते पाटीदप्तर.” हरदयाळ ओरडले.
शशीने पाटीदप्तर घेतले. हरदयाळांनी त्याची बकोटी धरली व अंगणाच्या टोकापर्यंत त्याला ओढीत नेले.
गरीब बिचारा शशी. तो रडत रडत शाळेत निघाला. दुपारची शाळा केव्हाच सुरू झाली होती. मास्तर वाचन घेत होते, शशी तिस-या इयत्तेत होता. शशी हळूच वर्गात शिरला. मास्तरांनी रागाने त्याच्याकडे पाहिले.