श्यामची आत्या 1
सीताआत्या मोठ्या चांगल्या घराण्यात जन्मलेली होती. तिच्या माहेरी श्रीमंती होती व सासरीही होती. सात बहिणी व चार भाऊ अशी ती एकंदर अकरा भावंडे होती. सर्व बहिणी सुस्थळी पडल्या होत्या. सीताआत्याच्या माहेरी शेतीवाडी रग्गड होती! चार गडीमाणसे होती. पंक्तीला पाहुणेराहुळे माहेरी असावयाचेच. तिच्या माहेरचा लौकिक दूरवर पसरलेला होता.
सीताआत्याच्या सासरची स्थितीही चांगली होती. तिच्या नव-याचे नाव रामचंद्रपंत, आडनाव गोडबोले. त्या गावात गोडबोले यांचे घराणे फार प्रसिद्ध होते. त्यांच्या गावाचे नाव सारंग. सारंग गावात रामचंद्रपंतांना मोठा मान मिळे. त्यांच्या नारळीपोफळीच्या मोठ्या बागा होत्या. त्यांना पाटाचे पाणी दिले होते. विहिरी मोठमोठ्या होत्या व त्यांना भरपूर पाणी होते. विहिरीत मुसळाएवढे झरे होते. त्यांच्या बागेत दहावीस खंडी सुपारी होत असे. त्यांच्या बागेत अननस, पपनस, फणस, चिक्कू यांची कितीतरी झाडे होती! श्यामला ते अननस अजून आठवतात. ते लाल व मधूनमधून हिरवट पट्टे अंगावर असणारे अननस आपण कसे खात असू, हे श्यामाला अजून चांगले स्मरते.
श्याम व त्याचे इतर भाऊ सीताआत्याकडे कितीदा तरी जात असत. विशेषतः चैत्र-वैशाखात आंबे-फणसाच्या दिवसात श्याम आपल्या आत्याकडे जावयाचाच ! आंबे, कोकंब, फणस वगैरेंची आत्याकडे नुसती रेलचेल असायची; त्यामुळे श्यामची मोठी मजा उडे.
सकाळच्या प्रहरी बागेत बैल रहाट सुरू होत. बैल वाटोळे फिरत व एक गडी बागेला पाणी लावी. त्या रहाटांचा सकाळच्या वेळेचा तो ‘कुऊं कुऊं’ आवाज श्यामच्या कानात अजून घुमत असतो. बागेला अशाप्रकारे पाणी लावण्याच्या कामाला कोकणात शिंपणे म्हणतात. एकीकडे बागेला पाणी मिळत असते व बायकाही त्याच वेळेस पन्हाळीवरून पाणी भरीत असतात, धुणी धूत असतात. सकाळच्या वेळी सीताआत्याच्या बागेत श्यामला मोठी मौज वाटायची. कधी कधी बागेची नासधूस करण्यासाठी वानरही यावयाचे; वानरिणीही येत व त्यांच्या पोटाशी पिले असत. कोकणातील वानरं फार धीट असतात. एकदा श्यामच्या दादाने एका वानराला दगड मारला, तर वानराने तोच दगड झेलून दादाला परत फेकून मारला ! पण सुदैवाने तो लागला नाही. बागेमध्ये हे वानर आट्यापाट्यासारखा खेळसुद्धा खेळतात; त्या वेळेस ती मोठीच पाहण्यासारखी गंमत असते.
सीताआत्या श्रीमंत होती, परंतु हळुहळू तिचे सौख्य नाहीसे होऊ लागले. मूलबाळ होईना. प्रथम प्रथम ती फार कष्टी दिसे. तिने पुष्कळ उपासतपास केले, व्रतवैकल्य केली, देवाला नवस केले; परंतु सीताआत्याला मूल झाले नाही. पावसाळ्याची शोभा तिच्या घराला लाभली नाही. मूल बसायचे भाग्य तिच्या मांडीला मिळाले नाही. यामुळे ती सदा उदास दिसे. परंतु वय वाढत गेले, तसतशी उदास वृत्ती कमी कमी होत चालली. तथापि दुस-या आपत्ती आल्या.