शशी 22
सूर्य मावळला. आकाशात शशीची कोर दिसू लागली. बाळ शशी घरी जावयास निघाला. मी कशाला घरी जाऊ ? मी कुणाला आवडत नाही. आई मला छळवादी म्हणते, बाबा मरतात, लोक मला मूर्ख-वेडा म्हणतात. मी कशाला घरी जाऊ ? देवाच्या घरी जाता आले तर ? कोठे आहे देवाचे घर ? कोण रस्ता दाखवील ? असे विचार करीत शशी घरी चालला होता. त्याच्या निष्पाप बालहृदयात कोणते विचार होते ते कोण सांगेल ?
शशी : मास्तर, मी फी दिली होती; त्या दिवशी नाही का दिली ?
मास्तर : अरे, पण येथे मांडलेली कोठे जाते ? मी का तुझी फी खाल्ली ? का रे मुलांनो, याने फी दिलेली तुम्हाला आठवते का ?
गोविंदा : त्या दिवशी मी दिली, लखूने दिली, हा खोटे सांगतो.
लखू : त्या दिवशी अमीन व शश्या पेपरमेंटच्या गोळ्या खात होते.
मास्तर : का रे शश्या ? चोरी करून पुनः फी दिली म्हणतोस का ? पेपरमेंड खाल्ले की नाही तुम्ही ? कबूल करा दोघेजण; नाहीतर मरेपावेतो तुडवीन !
अमीन : त्या पेपरमेंटच्या गोळ्या आईने दिल्या होत्या. मी विकत नव्हत्या आणल्या. आम्ही काही चोर नाही.
मास्तर : चोरी करून आणखी वर खोटे बोलता !
अमीन : खुदा की कसम.
मास्तर : थांब तुझा खुदा काढतो !
मास्तरांनी शशीला भरपूर चोप दिला. अमीनलाही बक्षीस मिळाले. मारून मारून मास्तर थकले. त्या दोघांनी गुन्हा कबूल केला नाही. त्यांनी पेपरमेंट विकत घेऊन खाल्लेच नव्हते, तर ते कबूल कसे करणार ?
शाळा सुटताना मास्तरांनी वामनजवळ शशीच्या वडिलांना देण्यासाठी एक चिठ्ठी दिली. “शशीने फी अद्याप दिली नाही. त्याने पेपरमेंट विकत घेऊन खाल्ले असे मुले म्हणतात, तरी नीट चौकशी करवी,” वगैरे मजकूर त्यांनी लिहिला होता.