मोलकरीण 3
सुट्टीमध्ये बाळ घरी येई. गोविंदभट जर कधी असले तर बाळाला म्हणत, “बाळ ! अरे संध्या केलीस का ?” बाळ एकदम कुर्रेबाजपणे म्हणे, “बाबा ? मला नाही आवडत संध्या. सुरेख कपाळाला भस्म लावा आणि पळीतले पाणी उडवा ! सारा बावळटपणा !” गोविंदभटजी म्हणत, “बाळ ! असे बोलू नये बरे ! स्नानसंध्या कधी टाळता कामा नये.” राधाबाई मुलाची बाजू घेत व म्हणत, “आता तो इंग्रजी शाळेत जातो, नाही एखादे दिवशी त्याने संध्या केली तर नाही का चालणार ?” पत्नीचे हे शब्द ऐकून गोविंदभटजींस फार वाईट वाटे. ते खिन्न होऊन म्हणत, “अगं, तू सुद्धा वेड्यासारखी काय बोलतेस ? संध्या न करून कसे चालेल ? आपला बाळ इंग्रजी शिकतो म्हणून आईबापांना जर विसरू लागला तर ते चालेल का ? धर्म हा आईबापांपेक्षाही थोर आहे. धर्माला विसरून कसे चालेल ? बाळ ! अरे, संध्या करीत जा. एक वेळ आम्हाला विसरलास तरी चालेल. मला त्याचे इतके वाईट नाही वाटणार. परंतु स्वधर्मकर्म सोडलेस तर मला मरणान्तिक दुःख होईल.”
बाळ छात्रालयात असला म्हणजे कधी कधी आई त्याला खाउ पाठवीत असे. कोणी जाणारा येणारा भेटला की बाळासाठी खाऊची पुरचुंडी त्याच्याबरोबर जावयाचीच. एकदा गोविंदभट फिरतीवर निघणार होते. राधाबाई त्यांना म्हणाल्या, “राजपूरकडून जावे म्हणजे बरे. बाळही भेटेल. त्याला हा खाऊ द्या. हा अंबाबाईचा अंगाराही न्या. बाळाला सांगा, की रोज लावीत जा.”
खाऊ व अंगारा घेऊन गोविंदभट निघाले. ते राजापूरच्या छात्रालयात आले. त्यांच्याकडे मुले आश्चर्याने पाहू लागली. हा प्राणी इकडे कोठे चुकला, असे त्यांना वाटले. गोविंदभटजींची घेरेदार पगडी, ती बाराबंदी खांद्यावरची पडशी-सारे पाहून मुले हसू लागली. सारे साहेबांची मुले! गोविंदभट बाळाची चौकशी करू लागले.
एका मुलाने विचारले, “तुम्हाला कोठे जावयाचे आहे? हे बोर्डींग आहे. याला छात्रालय म्हणतात. भटजींनी लाडू खाण्याचे हे ठिकाण नव्हे. अन्नछत्राची ही जागा नाही. येथे ‘पान्तु दक्षिणा दक्षिणाः पान्तु’ वगैरे काही नाही.”
दुसरा एक मुलगा म्हणाला, “तुम्हाला बी. जी. का पाहिजे? तो गावात पी. जी. कडे गेला आहे.”
तिसरा म्हणाला, “पी. जी. कडे नाही रे, आर.टी. बरोबर तो जाणार होता. भटजीबुवा बोलावू त्याला?”
छात्रालयात आल्यावर नावे बदलतात, हे गोविंदभटजींस माहीत नव्हते! सासरी गेल्यावर मुलीचे नाव बदलतात. इंग्रजी शिक्षणाने मुलांची नावे बदलतात याची कल्पना त्यांना नव्हती. गोविंदभटजी तेथे वेड्यासारखे उभे होते. इतक्यात बाळ आला. गोविंदभटजी आनंदले. “अरे बाळ! इकडे ये. किती वेळ रे वाट पाहायची? आणि हे रे काय? येथे न्हावी नाही का मिळत? असे केस नको हो वाढवू. ओंगळ सारे. ही खाऊची पुडी घे आणि हा अंगारा. संध्या करतोस ना? अभ्यास चांगला कर आणि प्रकृतीस जप.” असे म्हणून बाळाच्या पाठीवरून त्यांनी हात फिरविला. बाळाने काही पैसे मागितले. गोविंदभट म्हणाले, ‘बाळ! अरे,जरा जपून खर्च कर. एकेक दिडकी मिळवावयास दहादहा कोस हिंडावे लागते. या तोंडाच्या वेदविद्येला आता कोण विचारतो? हे घे पाच रुपये. मग पुढे आणखी वाटेतून पाठवीन हो! पहिल्या नंबरचा पास हो.’ असे सांगून संबोधून गोविंदभट निघून गेले. निघताना त्यांचे डोळे भरून आल्याशिवाय राहिले नाहीत.