शशी 31
शशी : माझे आईबाप येथे नसतात. मजजवळ पैसे नाहीत.
दुकानदार : मग कशी तसबीर मिळेल ?
शशी : मग माझी टोपी देऊ ! ही घ्या व मला तसबीर द्या.
शशीची टोपी नवीन होती. दुकानदाराने टोपी पाहिली व तो म्हणाला, “आण ती टोपी.” शशीने टोपी काढून दिली. दुकानदाराने त्याला ध्रुव-नारायणाची दुसरी तसबीर दिली. शशी आनंदला व घरचा रस्ता चालू लागला. वाटेत त्याला मिठारामने विचारले, “शशी, तुझी टोपी रे ! गर्दीत हरवली वाटते ! आता आई रागे भरेल. कोठे पडली !” शशीचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो म्हणाला, “मिठा, कशी आहे तसबीर ! कसा ध्रुव बसला आहे मांडी घालून ! मलाही असाच भेटेल का देव ! मिठा, भेटेल का रे?” असे म्हणून शशीने मिठारामला मिठी मारली. दोघेही गहिवरले होते, सदगदित झाले होते.
सायंकाळ झाली होती. जिकडे तिकडे दिवे लागले होते. शशी व मिठाराम घरी आले. “किती रे उशीर हा ! रघू केव्हाच आला. मिठा काय आणलेस चार आण्यांचे ?” आत्या बोलली. मिठाराम म्हणाला, “आई ही तसबीर आणली. कशी छान आहे बघ.” आत्या म्हणाली, “तसबीर कशाला ? पडली की फुटली, अक्कल असेल तर ना ? आणि तू रे काय आणलेस एक आण्याचे ?” शशी शांतपणे म्हणाला, “मी माझा आणा आंधळ्याला दिला.” “आंधळ्याला दिला ? मोठा उदार ? म्हणून एक आणा दिला. रुपया दिला असता तरी तू कोणाला देतास ? वेडोबा आहे शुद्ध ! आणि डोक्यावरची टोपी रे कुठे आहे ?” शश्या, तुला विचारत्ये आहे. वाचा बसली वाटते? अरे, टोपी कुठे आहे पोरा?” रागाने आत्याने विचारले. शशी शांतपणे म्हणाला, “माझी टोपी-माझी टोपी-” मिठाराम म्हणाला, “आई शशीची टोपी हरवली.” “होय का रे ? उद्या शाळेत कसा जाणार तू ?” आत्याने विचारले. “आत्याबाई, माझी टोपी देऊन ही तसबीर मी विकत आणली. मिठारामने घेतलेली तसबीर माझ्या हातून गर्दीत पडली अन् फुटली, म्हणून मी ही आणली.” “काय बाबा, हे उपद्व्याप ! नसत्या उठाठेवी ह्या तुझ्या ! शर्थ आहे बाबा तुझी ! कोण तुला सांभाळणार ?” आत्या बोलली.
शशी मुकाट्याने वर गेला. त्या तसबिरीसमोर त्याने डोके ठेवले होते. आपल्या अश्रूंनी तो त्या तसबिरीची पूजा करीत होता. दुस-या दिवशी शाळेत जाण्याची वेळ झाली. शशीला टोपी नव्हती. मिठाराम आईकडे गेला व म्हणाला, “आई, शशीला टोपी ?”
आत्या : ती दादाची घाला त्याच्या डोक्याला.
मिठाराम : आई, ती अगदी फाटली आहे.
आत्या : चालेल त्याला.
मिठाराम : त्या दिवशी दादाने त्या टोपीला शाई पुसली होती. ती गं कशी घालील ?
आत्या : तीच घाल म्हणावे. घरी बापाकडे जा आणि नवीन घेऊन ये; तोपर्यंत हीच घाल, असे त्याला सांग.