मोलकरीण 6
राधाबाई म्हणाल्या, “बाळ! शीक हो, तू पुष्कळ व हो मोठा. चांगला नावलौकिक मिळव. परंतु बाळ, तू दूर जाणार म्हणून का मला वाईट वाटणार नाही? तुला वाढविला, लहानाचा मोठा केला, आता दूर अनोळखी प्रांतात तू जाणार. आजारी पडलास, काही दुखले-खुपले, तर कोण आहे तेथे? येथे जवळ होतास तरी रोज दहादा तुझी आठवण येई आणि डोळे भरून येत. आता तर तू शेकडो कोस दूर जाणार. ‘जाऊ नको’ असे का मी म्हणते? जा. प्रकृतीस जप. स्वतःचे मुळीदेखील हाल नको करू. आमचे मेले इकडे कसे तरी होईल. तुला ती बारीक बारीक अक्षरांची लठ्ठलठ्ठ पुस्तके वाचावी लागतात; डोळ्यांना जप. दूध घेत जा अच्छेरभर. नेहमी खुशाली कळवत जा.”
पुण्यात जावयाचा दिवस जवळ आला. बाळाची तयारी झाली. आई म्हणे, “कोकमतेल घे.” बाळ म्हणे, “व्हॅसलीन असते आई! कोकमतेल नेले तर मुले मला हसतील!” आई म्हणाली, “दोन भिलावे असू देत बरोबर. बाळ म्हणाला, “आई! आता आयोडीन असते. भिलावा नेला तर तुझ्या मुलाला सारे हसतील!” आई म्हणाली, “तुला नको असेल तर नको नेऊ. मला वेडीला समजत नाही. आम्ही जुनी माणसे. माझ्या बाळाला कोणी हसावे असे का मला वाटेल? ठेव, ते भिलावे काढून ठेव. तो कोकमतेलाचा गोळा काढून ठेव.”
आईला नमस्कार करून बाळ निघाला. “सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः” असे स्तोत्र म्हणत गोविंदभटजी पोचवावयास गेले. राधीबाई वेढ्यापर्यंत गेल्या व बाळ दिसत होता तोपर्यंत तेथे उभ्या राहिल्या. नंतर त्या घरात आल्या. सारे घर त्यांना ओके ओके वाटत होते-जसे काय त्यांना ते खायला येत होते!
गोविंदभटजी पडशी घेऊन सर्वत्र हिंडत. ते आता विसावा घेत नसत. नदीला विसावा नाही, वा-याला विसावा नाही, गोविंदभटजींसही विसाव नाही, बाळाच्या शिक्षणाचा खर्च पुरा करण्यासाठी ते स्वतःच्या पोटाला चिमटा घेत! ना नीट धड नेसायला, ना पोटभर खायला! परंतु बाळासाठी ते आनंदाने हाल काढीत. बाळाला स्कॉलरशिप होत्या तरीही त्याला घरचे पैसे लागत. तो कॉलेजमध्ये होता, त्या कॉलेजमध्ये काय नको? बाळाला दोन पाय पुरे पडत ना, त्याने सायकल घेतली. त्याने निरनिराळ्या पद्धतीचे कोट शिवले. अर्धा-पाऊण डझन शर्ट शिवले. त्याने रॅकेट घेतली, स्लीपर घेतले. त्याची खोली तर एकदा पाहून घ्या! तो पाहा, एक सुंदर बिलोरी आरसा, ते कंगवे, त्या तेलाच्या सुंदर सुंदर बाटल्या, ती मलमे, ते पावडरीचे डबे, ते हजामतीचे सामान, ते अंगाला लावण्याचे व कपड्याला लावण्याचे साबण. तो स्टोव्ह, त्या स्पिरिटच्या बाटल्या, त्या पिना, त्या कपबश्या, तो चहाचा एक डबा, ते शर्ट, त्या कॉलरी, ते हातरुमाल, ते बूट, त्या चपला आणि त्या ब्रह्मचा-याच्या खडावा! ते नटनटींचे ध्येयमूर्त फोटो! तो पहा तेथे एक उदबत्तीचा पुडाही आहे! ती कॉट, मच्छरदाणी, त्या उश्या! वसतिगृहातील विद्यार्थांची खोली म्हणजे हॉटेल. सलून, वाचनालय, भोजनालय-सर्वांचे एकीकरण होय!
बाळाला मग पैशाची का बरे जरूर लागणार नाही? शिवाय एकांगी शिक्षण काय कामाचे? अपटुडेट माहिती आजकाल हवी. नवीन संस्कृतीचे संपूर्ण ज्ञान हवे, आकाशवाणीचे कार्यक्रम हवेत, बोलपटांचे हप्ते ठाऊक असले पाहिजेत, नाटके कोणती आज आहेत, कोणती उद्या, ते माहीत हवे, नट-नटी यांची नावे माहीत हवीत. क्रिकेट, हॉकी यांतील वीरांची नावे माहीत हवीत. कॉलेजमधील पुस्तकी शिक्षण व हे बाहेरचे संस्कारी व्यापक शिक्षण, दोहोंसाठी पैसा नको का? बाळाला पैसे पाठविण्यासाठी गोविंदभटजींना पायाचे पारवे केले होते. त्यांनी निंदास्तुती, मानापमान यावर काठी लावली होती. ते घरोघर तोंड वेंगाडीत व पैसे गोळा करीत.