शशी 32
शाई पुसलेली फाटकी टोपी शशीच्या डोक्याला घालण्यात आली, मिठारामला वाईट वाटले परंतु तो काय करणार ? शशी शाळेत गेला. शाळेतील मुले शशीची हुर्यो करू लागली. कोणी त्याला माकड म्हणे, कोणी सोंग म्हणे, कोणी विदूषक म्हणे. शशीच्या पाठीमागे सारी शाळा लागली ! शशीला त्या टोपीचा राग आला. त्याने त्या टोपीचा चोळामोळा करून ती बाहेर गटारात फेकून दिली. शशी वर्गात बोडकाच बसला. सारी मुले त्याच्याभोवती जमून हसू लागली. त्या कावळ्यांत शशी राजहंसाप्रमाणे शोभत होता ! त्या कोल्ह्यांत शशी लहान सिंहाच्या छाव्याप्रमाणे दिसत होता.
इतक्यात घंटा झाली. मुले शशीला म्हणाली, “अरे,वर्गात बोडका काय बसतोस ? मास्तर आता य़ेतील- घरी जा, ऊठ.” परंतु शशी शांत बसला होता. बालमुनीप्रमाणे तो बसला होता. जणू शुक्र, ध्रुव, प्रल्हादच ! जणू चिमणा चिलया वा थोर रोहिदासच ! ती पाहा, दुसरी घंटा झाली व मास्तर वर्गात आले.
मास्तर वर्गात येऊन खुर्चीवर बसले मात्र, तो सारी मुले फिदीफिदी हसू लागली. आपली शेंडीबिंडी तर नाही ना बाहेर राहिली, असे मनात येऊन मास्तरांनी डोक्याभोवतून हात फिरवला. इतक्यात त्यांचे लक्ष समोर गेले. तेथे बोडका शशी बसला होता.
मास्तर : अरे ए पोरा ! बोडका काय वर्गात बसतोस ? टोपी कोठे आहे ?
शशी : मास्तर, माझी टोपी नाही.
मास्तर : टोपी नाही ? मग शाळेत कशाला आलास ? मास्तरांचा अपमान करतोस होय ? ही का धर्मशाळा आहे ?
शशी : मास्तर, टोपी नसली तर नाही का चालणार ? माझ्याजवळ पाटी आहे, पेन्सिल आहे, पुस्तके आहेत.
मास्तर : पाटी-पुस्तके एक वेळ नसली तर चालतील, परंतु डोक्याला टोपी पाहीजेच. सुतक्यासारखे वर्गात वर्गात बसावयचे वाटते ? तुला लाज नाही वाटत ? चावट पोर ! ऊठ, चालता हो. अपमान करतोस ?
शशी : मास्तर, त्या ध्रुव-नारायणाच्या तसबिरीत ध्रुवाच्या डोक्यावर कोठे आहे टोपी ? एवढा देव ध्रुवासमोर उभा आहे, तरी ध्रुवाच्या डोक्यावर टोपी नाही. देवाचा अपमान होत नाही, मग तुमचा कसा होईल ? मास्तर, माझे आईबाप येथे नाहीत. मी असाच बसलो तर नाही का चालणार !
मास्तर : नाही चालणार, जा, चालता हो. टोपी डोक्याला असेल तरच वर्गात ये. तोपर्यंत येऊ नकोस.
शशी घरी जावयास निघाला. निराधार बाळ रडत घरी आला. आत्याबाई उष्टे शेण करून नुकत्याच जरा पडल्या होत्या. शशीने हळूच दार उघडले. जिना चढून तो वर गेला. आत्याला चाहूल लागली. कोण आले म्हणून पहावयास आत्याबाई उठल्या. तो शशी त्यांच्या दृष्टीस पडला.