शशी 34
शशी नळावर पाय धुण्यासाठी गेला. त्याला घेरी आली व तो पडला. पुनः आज हातातील तांब्या पडला! आत्या घसारा घालीत बाहेर आली व म्हणाली, “वाजले तांब्याचे पुरे बारा! अभिषेक-पात्र झाले असेल आता. तुला झालंय तरी काय रामोश्या!” असे बोलूनच आत्या थांबली नाही, तर शशीच्या तापलेल्या पाठीवर आत्याने तडाखा दिला. शशी कसाबसा उठला व पानावर बसला. त्याने बळेच दोन घास खाल्ले व तो अंथरुणावर जाऊन पडला.
दोन दिवस झाले तरी शशीचा ताप निघाला नाही. शशीच्या वडिलांना तार देण्यात आली. शशीचे वडील निघून आले. शशीच्या अंगात फार ताप होता. तो निपचित पडला होता. त्याला शुद्धही नव्हती. हरदयाळ शशीजवळ बसले होते. हरदयाळांना शशीची दशा पाहून रडू आले. तो कठोर पहाड पाझरला. हरदयाळ प्रेमाने हाका मारीत होते. हरदयाळ म्हणाले, “शशी, बाळ शशी, मी आलो आहे. बघ, डोळे उघडून बघ, शशी.”
ते पाहा शशीने जरा डोळे उघडले. परंतु मिटली, ती नेत्रकमळे पुनः मिटली. हरदयाळांनी पुनः हाक मारली, “शशी, बोल ना रे, बाळ!” ते पाहा, प्रेमासाठी भुकेलेले आपले डोळे शशीने उघडले. शशीने पुनः डोळे मिटले. हरदायाळांनी तोंड खाली केले, शशीच्या तोंडाजवळ नेले. पुनः प्रेमाने थबथबलेली हाक त्यांनी मारली. “बाळ शशी!” शशीने डोळे पूर्ण उघडले व एकदम बापाला मिठी मारली. “बाबा, बाबा!” एवढेच तो म्हणाला. हरदयाळांनी शशीचे डोके मांडीवर घेतले व ते म्हणाले, “शशी, काय बाळ?” शशी भरल्या आवाजाने म्हणाला, “बाबा, मला बाळ म्हणा, म्हणा, बाळ शशी. मला कोणी बाळ म्हटले नाही. तुम्ही म्हटले नाही, आईने म्हटले नाही. बाबा मला ‘शश्या, शश्या’ असे नका ना म्हणू! मला आता मारू नका. बाबा, मला किती मारलेत! आता नाही ना मारणार? हो, नाही मारणार माझे बाबा. ते आता मला बाळ म्हणतील.”
बोलून शशी दमला. बापाच्या मांडीत त्याने तोंड खुपसले. त्याचे कढत अश्रू बापाच्या मांडीवर गळले. हरदयाळ विरघळले. त्यांचा हदयसिंधू हेलावला. परंतु अजूनही शशी पूर्णपणे त्यांना समजला नव्हता. शशीचे अंतरंग त्यांना सर्वार्थी कळले नव्हते. शशीच्या जीवनाशी ते अजून एकरूप झाले नव्हते. शशीचे आता कोठे थोडेसे दर्शन त्यांना झाले होते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने शशीला घरी न्यावयाचे ठरले. मोटार तयार झाली. गार वारा लागू नये म्हणून पडदे लावले होते. बर्फाची पिशवी घेतली होती. बर्फ भुशात घालून बरोबर घेतला होता. निघण्याची तयारी झाली. मिठाराम हरदयाळांजवळ आला व म्हणाला, “ही तसबीर मी शशीसाठी घेतली होती. ही घेऊन जा. ही शशीला फार आवडते., मी शशीसाठी देवाची प्रार्थना करीन. माझी आई शशीला रागावे, पण मला वाईट वाटे.” असे बोलता बोलता मिठारामचे डोळे भरून आले.
मोटार सुरू झाली. शशीच्या डोक्याला मफलर बांधला होता. शशीचे डोके बापाच्या मांडीवर होते. त्या वेळेस केवढे समाधान त्याच्या तोंडावर दिसत होते! शशी डोळे मिटून पडला होता. तो मध्येच डोळे उघडी व वडिलांकडे बघे. वडिलांचा हात-तो मारणारा कठोर हात-शशी आपल्या कढत हातात घेई व त्यांचा हात आपल्या हृदयावर धरून ठेवी. प्रेमसिंधू शशी पित्याला प्रेमाचे धडे देत होता. प्रेमसिंधू शशी पित्याच्या कोरड्या हृदयात प्रेमाचे धडे ओतीत होता. शशीचे वडील मध्येच वाकून शशीचे चुंबन घेत. त्या कोमेजणा-या फुलांवर हरदयाळांच्या डोळ्यांतले चार थेंब पडत व ते फूल टवटवीत दिसे.