मोलकरीण 24
स्वयंपाकीणबाई म्हणाल्या, “अहो, निवूनसुद्धा चालले. केव्हाच झाले आहे.”
दिनेशला राधाबाईंजवळ देऊन मालती अंग धुवायला गेली. राधाबाई दिनेशल न्हाऊ-माखू घालू लागल्या; त्याच्या अंगाला दूध, हळद, तेल लावू लागल्या. त्याच्या टाळूवर तेल घालून,
“तो तो तो! बाळाची बायको यो यो यो!
तो तो तो ! बाळाच्या बाबांना गुण यो यो यो!”
असे त्या म्हणत होत्या. त्याला पायांवर न्हाऊ घालून पाळण्यात चुरचरीत अंथरुण केले होते त्यावर. त्यांनी निजविले. “नीज हो बाळ, आता चांगला दोन तास.” असे म्हणून राधाबाई पाळण्याला झोका देऊ लागल्या. बाळ दिनेश झोपी गेला.
रात्री ९ वाजून गेले होते. नरेश आपल्या लहानशा गादीवर निजला होता. दिनेश पाळण्यात झोपला होता. खंडू व दुसरा एक शिपाई बाहेर झोपले होते, स्वयंपाकीणबाई खाली निजल्या होत्या.
“तुम्ही बसता ना राधाबाई? मी जरा पडत्ये. त्यांचा डोळा लागला आहे. कमीजास्त झाले तर मला उठवा बरे का. निजू मी?” मालतीने विचारले.
“निजा हो, बाईसाहेब, रोज रोज तुम्हाला जागरणे होतात. पडा तुम्ही. मी बसत्ये, निश्चिंत निजा.” राधाबाईंनी सांगितले.
तेथेच खाली गादी घातलेली होती, तिच्यावर मालती निजली.
“राधाबाई, माझ्या अंगावर ती शाल घाला बरे. माझेसुद्धा अंग जरा दुखते आहे, कणकण करते आहे. पाय वळताहेत.” मालती म्हणाली. “पाय जरा चेपू का बाईसाहेब? कपाळ दुखते?” मालतीच्या अंगावर पांघरुण घालीत राधाबाईंनी विचारले. “हं, चेपा जरा पाय,” मालती म्हणाली. “खालीवर खेपा करून दुखू लागले असतील हो.” असे म्हणून सुनेचे पाय सासू चेपू लागली; धनिणीचे पाय मांडीवर घेऊन मोलकरीण चेपू लागली. मालतीचा डोळा लागला. ती झोपली.
पलंगावर बाळासाहेब झोपले होते, खाली गादीवर मालती झोपली होती. राधाबाईंनी गळ्यातील जपमाळ काढून देवाचा धावा सुरू केली. त्यांचे हृदय वात्सल्याने भरून आले होते. मुलगा व सून तेथे निजली होती. दोन्ही सुखाने निजली होती. “देवा, सर्वांना सुखी ठेव. त्यांचे अपराध क्षमा कर. माझ्या बाळाचे अपराध मी कधीच विसरून गेल्ये; देवा, मग तू नाही का विसरणार? तू तर मातांची माता. परम थोर माऊली. तू चंद्राहून शीतल, अमृताहून गोड, दयेचा सागर तू. देवा, माझ्या बाळाला आराम पाड-”