बापूजींच्या गोड गोष्टी 100
१११
महात्माजी त्या वेळेस महाबळेश्वरला होते. त्यांना भेटायला दिल्लीहून देवदासही मुलाबाळांसह आले होते. गांधीजींच्या भोवती सा-या जगाचा व्याप. पुढारी भेटीला यायचे, सा-या जगातील बातमीदार यायचे. चर्चा चालायच्या. पत्रव्यवहार असायचा.
तो पहा देवदासांचा मुलगा गणित सोडवण्यात मग्न आहे. परंतु त्याला ते सुटत नाही. ‘हे गणित कसं सोडवायचं सांगता का?’ असे तो मुलगा अनेकांना जाऊन विचारीत आहे. परंतु या मुलाच्या प्रार्थनेकडे कोण लक्ष देणार? शेवटी तो लहानगा आजोबांकडे गेला व म्हणाला; ‘बापू, इतकी माणसं आहेत, पण एकजण मला गणित सांगेल तर शपथ. तुम्ही सांगता का?’
बापू हरिजन साप्ताहिकासाठी लेख लिहिण्यात गढले होते. परंतु त्या बालब्रह्माला ते दूर कसे लोटणार? ते प्रेमाने म्हणाले; ‘ये इकडे माझ्याजवळ. काय हवं तुला? अरे, त्या लोकांना फार कामं असतात. तू मलाच आधी यंऊन का विचारलं नाहीस? आता काही अडलं सवरलं तर सरळ माझ्याकडे येत जा. बरं का? बघू तुझं गणित?’
महत्त्वाचा एक लेख लिहिण्यात गढलेले बापू नातवाची वही घेऊन त्याला गणित समजावून देऊ लागले!