बापूजींच्या गोड गोष्टी 5
५
१९३१ साली कराचीची काँग्रेस भरली. ३० सालचा मिठाचा सत्याग्रह थांबला होता. सरकारशी झुंजून हिंदी राष्ट्र विजयी झाले होते. जगात हिंदी राष्ट्राची प्रतिष्ठा वाढली होती. व्हाइसरॉयने गांधीजींजवळ करार केला होता आणि महात्माजी लंडनला गोलमेज परिषदेत भाग घ्यायला जाणार होते. कराची काँग्रेसने त्यांना आपले एकमेव प्रतिनिधी म्हणून निवडले. गांधीजी विलायतला निघाले. तेच कपडे, तोच साधेपणा. बरोबरच्या लोकांनी त्यांच्यासाठी अधिक कपडे घेतले होते. गांधीजींनी ते एडनहून परत पाठवले. म्हणाले : ‘मी दरिद्रीनारायणाचा प्रतिनिधी आहे.’ पंचा लावून हा भारताचा योगिराणा, महान नेता, ख्रिस्ताचा अवतार लंडनला पोचला. मजुरांच्या वस्तीत ते राहिले. त्यांना नाही बाधली थंडी, नाही बाधला बर्फ. मुलांचे ते फार आवडते झाले होते. त्यांच्याबरोबर ते फिरत, हसत, बोलत.
वाटोळ्या परिषदेचे कार्य चालू होते. चर्चा, व्याख्याने रोज होत होती, पण जीनासाहेब काही जालू देत ना. परंतु मला तेथील हकीगती नाही सांगायच्या. गोलमेज परिषदेशिवाय महात्माजींना इतरही अनेक ठिकाणी जावे लागे. मुलाखती, भेटीगाठी, प्रश्नोत्तरे, वृत्तपत्रकार-परिषदांसारखे काही ना काही चालू असे.
अशीच एक सभा होती. महात्माजी बोलले. त्यांनी ब्रिटिश राजवटीत हिंदुस्थानचा कसा सर्वतोपरी अध:पात झाला आहे ते निवेदले. भारातातील भीषण दारिद्र्याचे त्यांनी करुणगंभीर चित्र उभे केले. सभा स्तब्ध होती; परंतु एकाने उठून विचारले :
‘गांधीजीं, ब्रिटिश भांडवलशाही सत्तेच्या आधाराने हिंदी जनतेस पिळत आहे ही गोष्ट खरी; परंतु तुमच्या देशातीलही कारखानदार, जमीनदार, मालकवर्ग, जनतेचे रक्तशोषण नाही का करीत? तुमचे भांडवलवालेही पापी नाहीत का?’
महात्माजी म्हणाले :
‘देशातील भांडवलवालेही पापी आहेत. परंतु त्यांच्या पापांचंही मूळ तुमच्यातच आहे. मी जर हिंसावादी असतो आणि गरिबांना नाडणा-या माझ्या देशातील मालकांना मी जर दोन गोळ्या घातल्या असत्या तर ब्रिटिशांना मी चार घातल्या असत्या. तुमचं हिंदुस्थानातील पाप अपार आहे. शेदीडशे वर्षांची लूट! पर्वताप्रमाणं पाप! हिंदी भांडवलशाहीच्या पापाला आता कुठं प्रारंभ आहे.’
कसे तेजस्वी उत्तर गांधीजींनी दिले! गांधीजी निर्भय नि नि:स्पृह होते. ज्याच्याजवळ सत्याचे अधिष्ठान असते तोच असे बोलू शकतो.