बापूजींच्या गोड गोष्टी 18
१९
महात्माजी म्हणजे धृतव्रत. घेतलेले व्रत त्यांनी कधी सोडले नाही. ते रोज कातीत असत. रोजचे कातणे कधी राहिले नाही. कधी कधी स्वत:चे पेळूही ते तयार करून घेत असत. एके दिवशी त्यांचे कातणे राहिले होते. पेळूही संपले होते.
‘आज माझे पेळू मीच तयार करतो. आणा युद्धपिंजण, कापूस छान पिंजतो.’ राष्ट्राचा तात कापूस पिंजत बसला. रात्रीची वेळ होती. महात्माजी तुईंतुईं करीत पिंजत होते. परंतु हवेत आर्द्रता होती. पिंजण्याची तात ओलसर होई. तिला कापूस चिकटून बसे. नीट पिंजता येईना.
मीराबेन जवळच होत्या. मीराबेन म्हणजे सेवामूर्ती. पंचक्रोशीत औषधे घेऊन हिंडायच्या. झोपडीझोपडीतून जायच्या.
‘बापू, नीट नाही पिंजता येत?’
‘कापूस चिकटतो. एक युक्ती आहे.’
‘कोणती?’
‘निंबाचा पाला चोळून तो तातीवर फिरवला की कापूस चिकटत नाही.’
‘मी घेऊन येऊ पाला!’
‘हां आण.’
मीराबेन बाहेर गेल्या. त्यांनी निंबाच्या झाडाची एक भली मोठी फांदीच तोडून आणली.
‘हा घ्या पाला. फांदीच आणली आहे. भरपूर पाला.’
‘मूठभर पाला आणायचा तर एवढी फांदी कशाला आणलीस? आणि इकडे ये. ही बघ पानं कशी झोपल्यासारखी दिसतात, नाही? उगीच तू फांदी आणलीस. जरूरच होती म्हणून मूठभर पाला आणायचा, खरं ना?’
महात्माजी बोलत होते. मीराबेनचे डोळे अश्रूंनी भरले. महात्माजींचे झाडामाडांवरील प्रेम पाहून मीराबेन यांना एक नवीन दर्शन घडले. भारतीयांच्या आध्यात्मिक वृत्तीवरचे ते भाष्य होते. आत्मा सर्वत्र बघायला शिकावा, यावरील ते मूक प्रवचन होते. महात्माजी प्रेमसिंधू होते.