बापूजींच्या गोड गोष्टी 97
१०६
याच उपवासाच्या वेळचे महादेवभाईंनी नाशिकच्या तुरुंगात पाठवलेले एक पत्र आठवते. उपवास चालू होता. पर्णकुटीच्या व्हरांड्यात खाटेवर महापुरुष पडून होता. त्यांना जरा झोप लागली होती. सभोवार सुंदर गंभीर सृष्टी होती. महादेवभाईंनी लिहिले; ‘बापू झोपले आहेत. एखाद्या लहान बालकाप्रमाणे झोपले आहेत. जणू विराट सृष्टीमातेच्या कुशीत हे बाळ झोपलं आहे. केवढं भव्य व उचंबळणारं हे दृश्य!’
१०७
सेवाग्रामला असताना महात्माजी सकाळी फिरायला जात. फिरून परत येताना कोणी आजारी असले तर त्याच्या झोपडीवर जाऊन ते विचारपूस करीत. एकदा एका झोपडीजवळ ते आले. त्यांच्या कानांवर पुढील सुंदर अभंगचरण आले :
संत जेणे व्हावे । जग-बोलणे सोसावे
तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान
थोरपण जेथे वसे । तेथे भूतदया असे
रागे भरावे कवणासी । आपण ब्रह्म सर्व देशी
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
विश्व झालिया वन्हि । संतमुखे व्हावे पाणी
तुम्ही तरोन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
मजवरी दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।
गांधीजी ते चरण ऐकून तन्मय झाले. झोपडीबाहेर उभे राहून ते अभंग कानांनी पीत राहावे असे त्यांना वाटले.
श्री. परचुरेशास्त्री ते अभंग सुस्वर आवाजात म्हणत होते. मुक्ताबाईचे हे ताटीवरचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांतील चरण आठवतील तसे ते म्हणत होते. परचुरेशास्त्र्यांना ते अभंग फार आवडायचे.
थोड्या वेळाने समाधी उतरल्यावर गांधीजी झोपडीत आले व म्हणाले;
‘शास्त्रीजी, हे अभंग मला उतरून द्या. मी ते पाठ करणार आहे. किती प्रेमळ आणि उदात्त! कोणाचे हे अभंग?’
‘मुक्ताबाईचे. ज्ञानेश्वर महाराजांची ती धाकटी बहीण. एकदा आळंदीस असताना ज्ञानेश्वर रस्त्यातून जात होते, ‘संन्याशाचा पोरगा दृष्टीस पटला, अपशकून झाला’. असं काही टवाळ लोक मोठ्यानं ओरडले. ज्ञानेश्वर विषण्ण झाले. ते खोलीत जाऊन दार लावून बसले. मुक्ताबाई पाणी आणण्यासाठी गेली होती. ती आली तो दार बंद. तेव्हा तिनं जो अभंग केले तो ‘ताटीवरचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ असं आहे.’
परचुरेशास्त्र्यांना सारे अभंग नीट आठवत ना. त्यांनी पुण्यास प्रा. दत्तोपंत पोतदार यांना लिहून ते सारे अभंग मागवून घेतले व गांधीजींना लिहून दिले.