बापूजींच्या गोड गोष्टी 72
७४
‘चले जाव’ लढा सुरू होता. बापूजी, कस्तुरबा, महादेवभाई प्यारेलाल, डॉ. गिल्डर, डॉ. सुशीला नायर, देवी सरोजिनी इत्यादी मंडळी पुण्याला आगाखान राजवाड्यात स्थानबद्ध होती.
श्री. महादेवभाई तर १५ ऑगस्टलाच देवाघरी गेले. तुरुंगात जाऊन आठवडाही झाला नव्हता. बा आणि बापू यांच्या हृदयावर तो कठोर आघात होता. परंतु दु:ख गिळून सारी राहत होती.
तुरुंगातील वेळ तरी कसा जायचा? कस्तुरबा, डॉ. गिल्डर व इतर मंडळी कधी रात्री कॅरम खेळत. बांना कॅरम फार आवडे. त्या खेळतही छान.
बापूही निरनिराळे खेळ खेळायचे. बॅडमिंटन, पिंगपाँग खेळायचे. बापू पिंगपाँग खेळायला प्रथम ज्या दिवशी आले, त्या दिवशी ते लहान बॅटीने चेंडू परतवणार तो त्यांच्या डोक्यावर आपटूनच तो परत गेला. सर्वांना हसू आले.
एकदा गमतीदार पोषाख करायचे असे ठरले. डॉ. गिल्डर यांनी बलुची पठाणाचा वेष घेतला. बापूंना बसू आवरेना.
डॉ. गिल्डरांचा वाढदिवस आला तेव्हा हातरुमालावर स्वत:च्या हाताने नाव भरून बापूजींनी त्यांना तो रुमाल भेट दिला. राष्ट्राला मुक्त करणारा महात्मा आगाखान पॅलेसमध्ये भरतकामही करी!
परंतु एक गोष्ट मला उचंबळविती झाली. बांचेही जवळ जवळ ७० वय. बापूंची सत्तरी संपलेली. वेळ जावा म्हणून बापू कस्तुरबांना भूगोल शिकवीत. पू. विनोबाजी म्हणायचे, ‘भूगालासारखा रसाळ विषय नाही.’ भारताचा तात वृद्ध कस्तुरबांना तुरुंगात भूगोल शिकवीत आहे, हे दृश्य डोळ्यांसमोर येऊन मी सद्गदित होतो. मधुर, मंगल, सहृदय दृश्य!