बापूजींच्या गोड गोष्टी 46
४८
गांधीजी तिथळ येथे राहत होते. त्यांचा तेथे मुक्काम असता बोर्डी येथील गोखले-शिक्षणसंस्थेतील एक शिक्षक तेथे गेले होते. त्यांचे नाव श्री. ग. म. मळेकर. गांधीजींची व त्यांची चांगलीच गट्टी जमली. कारण, गांधीजी हे नामदार गोखल्यांना गुरुस्थानी मानीत असत. हे शिक्षक ३-४ दिवसच बापूजींच्या सहवासात होते. परत येण्यास निघतेवेळी ते शिक्षक बापूजींस म्हणाले : ‘बापूजी, तुम्ही एकदा बोर्डीस या. काका (काकासाहेब कालेलकर) पण २-४ महिने तिथं प्रकृतिस्वास्थासाठी आले होते व त्यांची प्रकृती पण बोर्डीला निरर्गरम्य वातावरणात चांगलीच सुधारली होती.’ बापूजी म्हणाले : ‘बरं तर. मी आजारी पडलो की बोर्डीला जरूर येईन.’ त्या शिक्षकांना फार वाईट वाटले. ते म्हणाले :’ बोर्डीस येण्यासाठी आजारी पडू नका. आपण चांगले असतानाच यावे.’ बापूजी म्हणाले : ‘येईन. पण एका अटीवर. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात १०० कुटुंबं खादीधारी व १०० अशी कुटुंबं की, जी हरिजन घरात बाळगतील, अशी बनवा व मग मी बोर्डीस अवश्य येईन.’ ते शिक्षक काहीच बोलले नाहीत. सामान्य व्यक्तीकडून पण काही तरी उपयुक्त काम करून घेण्याची असामान्य कला बापूजींत पूर्णत्वाने होती.
ते शिक्षक बापूजींची अट पूर्ण करू शकले नाहीत . बापूजींचे अत्यंत आवडते असे हरिजन कार्य, त्याला मात्र ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने खूप मदत करीत असतात. पण गांधीजींनी दिलेला शब्द त्यांनी मृत्यूनंतरही पाळला. रक्षेच्या रूपाने गांधीजी बोर्डीस आले व त्यांनी त्या शिक्षकास दिलेला शब्द पाळला.
दिलेला शब्द प्राणापलीकडे पाळणे, यातच सर्व शील साठवलेले असते. बापूजींची अशी अत्यंत थोर शिकवण असे.