बापूजींच्या गोड गोष्टी 41
४३
गेल्या खेपेस गांधीजीं आगाखान पॅलेसमध्ये होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या परिवारातील मंडळीसुद्धा होती. सरोजिनी नायडूसुद्धा होत्या. आगाखान पॅलेसभोवती होते एक मोठे आवार. तेथेच सायंकाळी बापू फिरत. सुरुवातीच्या काही दिवसांत सकाळ-संध्याकाळ या आवारात फिरणे हीच या मंडळींची करमणूक असे.
काही दिवस लोटल्यानंतर सरकारने या मंडळींची आवारात खेळण्याची सोय करून दिली. बॅडमिंटनचा खेळ या मंडळींना फार आवडे. सरोजिनीदेवींचा तर हा खेळ खास आवडीचा.
खेळाचे सामान आले. खेळासाठी लागणारे खास पटांगण चापून चोपून तयार करण्यात आले. सगळी तयारी झाल्यावर सरोजिनीबाई खेळायला पटांगणात उतरल्या. गांधीजी आपले नेहमीचे व्रत पार पाडीत होते. पॅलेसच्या व्हरांड्यात सूत कातत होते. त्यांची दृष्टी सरोजिनीकडे गेली. ते म्हणाले :
‘काय सरोजिनी, एकटीच खेळतेस? मला घेणार का खेळात?’
त्या म्हणाल्या : ‘बापू, मी काय, वाटेल तेव्हा घेईन. पण तुम्हांला खेळायची माहिती असेल तर ना?’
बापू म्हणाले : ‘वा, त्यात काय झालं? तू खेळशील तसं पाहून मी खेळेन.’ आणि बापू खरोखरीच खेळायला खाली उतरले. आपल्या पाठीमागे राष्ट्रात काय चालले आहे याची सदैव चिंता करणारा तो महापुरुष खेळायला निघाला. आदल्याच दिवशी या राजकारणी महापुरुषाने एखादे महत्त्वाचे पत्र व्हाइसरॉयला लिहिले असेल- आणि आज तो सर्व चिंता; यातायात विसरून खेळात रमणार होता.
बापू येताच सरोजिनीबाईंनी खेळण्यासाठी फूल हातात घेतले, तो काय, बापू डाव्या हातात रॅकेट घेऊन खेळायच्या पावित्र्यात उभे! सरोजिनीबाई हसू लागल्या. म्हणाल्या, ‘बापू, रॅकेट कुठल्या हातात घ्ययची ते माहीत नाही आणि खेळायला निघालात!’
बापू म्हणाले : ‘माझं काय चुकलं? तू डाव्या हातात रॅकेट धरलीस. मीही धरली. तू करशील तसं मीही करणार.’
तेव्हा कोठे सरोजिनींच्या ध्यानात आले. त्या म्हणाल्या :
‘माझा उजवा हात दुखतो म्हणून मी डाव्या हातानं खेळत आहे. तुम्ही आपले उजव्या हाताने खेळा कसे.’ महात्माजींनी हात बदलला. फूल इकडून तिकडे उडू लागले. इतक्यात सरोजिनीबाई खेळायच्या थांबल्या. ‘हे काय बापू? पुन्हा डावखोरे खेळता?’ खरेच; बापू पुन्हा डाव्या हातानं खेळत होते. ते म्हणाले : ‘होय, मी आपला डाव्या हातानं खेळतो कसा. नाही तर मी जिंकल्यावर म्हणायचीस, उजव्या हातानं खेळत होतात, म्हणून तुम्ही जिंकलात!’
गांधीजींचा विनोद ऐकून खेळ पाहायला जमलेली सगळीच मंडळी हसू लागली आणि खेळ पुढे सुरू झाला.
राष्ट्राची नि मानवतेची चिंता वाहणारा महापुरुष अनेक वेळा खेळात-विनोदात मग्न झालेला दिसायचा. पाउणशे वर्षांच्या या वृद्धात पंचविशीतील तरुणाचा खेळण्याचा उत्साहही अनेक प्रसंगी दिसत असे.