बापूजींच्या गोड गोष्टी 74
७६
आरंभी लहान मुलाचीच एक गोष्ट सांगतो. कारण लहान मुले म्हणजे देवाचे रूप. त्यांचे मन निर्मळ, हृदय निर्मळ. बापूजींना लहान मुले फार आवडायची.
एकदा बापू आपले खाणे घेत होते. ते तर मोजून खायचे. पाच पदार्थांहून अधिक घ्यायचे नाहीत. त्या दिवशी कोणीतरी द्राक्षे वगैरे फळांची भेट आणून दिली होती. भेटीची फळे आधी जो कोणी आजारी असतील त्यांना मिळायची.
गांधीजी आहार घेत होते. फळे खात होते. इतक्यात कोणी मंडळी भेटायला आली. ते एक प्रेमळ कुटुंब होते. आईबाप, लहान मुलगा, सारी मंडळी आली. गांधींना प्रणाम करून सारी बसली. त्या मुलाने बापूंकडे पाहिले. तो आईजवळ काहीतरी म्हणू लागला. आई त्याला दटावीत होती.
‘वेडे आहेत गांधीजी. होय, वेडेच आहेत.’ तो बाळ म्हणाला.
‘असं म्हणू नये, गप्प.’ आई रागाने म्हणाली.
‘वेडेच आहेत.’ तो पुन्हा म्हणाला.
‘मार हवा का?’ आई रागाने बोलली. गांधीजींचे लक्ष गेले. आपल्या चष्म्यातून त्यांनी हसत पाहिले.
‘वेडे आहात तुम्ही.’ मुलगा म्हणाला. आईबापांची व इतरांची तोंडे काळवंडली. परंतु तो राष्ट्राचा पिता मोठ्याने हसला.
‘का रे मी वेडा? सांग तर खरं!’ बापू हसून म्हणाले.
‘तुम्ही एकटे एकटे खाता. कोणाला देत नाही. आई मला एकदा म्हणाली होती, ‘एकटा खातोस, वेडा आहेस. दे त्या मुलाला.’ आणि तुम्ही तर एकटे खात आहात. म्हणून वेडे.’
‘होय. खरं आहे. ही घे तुला फळं. आता झालो ना मी शहाणा? घे.’
‘मला नको जा.’
‘का?’
‘आई म्हणते दुस-यानं दिलेलं घेऊ नये.’
‘अरे, एकदम नये घेऊ, परंतु आग्रह केल्यावर घ्यावं. घे.’
आईबापांनी सांगितल्यावर त्या मुलाने फळे घेतली. सर्वांना हसू आले. गंमतीची गोष्ट, नाही?