बापूजींच्या गोड गोष्टी 79
८१
१९२२ च्या मार्च महिन्यात महात्माजींना शिक्षा झाली. बारडोलीचा लढा मागे घेतल्यावर अटक करण्याची जरुरी नव्हती; परंतु लढा मागे घेतल्यामुळे गांधीजींविषयी लोक आणि लोकनेते नाराज आहेत असे पाहून सरकारने त्या तेज:सूर्याला तुरुंगात कोंडायचे ठरविले. महात्माजींनी गुन्हा कबूल केला. ‘या राज्याविरुद्ध अप्रीती उत्पन्न करणे माझा धर्म’ असे म्हणाले. आणि लोकमान्यांना पूर्वी सहा वर्षांची शिक्षा दिलेले उदाहरण डोळ्यांसमोर आणून न्यायमूर्तींनी गांधीजींनाही सहा वर्षांची शिक्षा दिली. सहा वर्षे राष्ट्राचा तात दिसणार नव्हता. महादेवभाई रडू लागले. खटल्याच्या वेळेस तात्यासाहेब केळकर अहमदाबादला मुद्दाम गेले होते. ते महादेवभाईंना शांत करीत होते. ‘लोकमान्यांना शिक्षा झाली तेव्हा आम्हांलाही असंच रडू आलं’ सांगून ते महादेवभाईंना धीर देत. गंभीर पण हृदयद्रावक प्रसंग.
परंतु बंगालमधील एका खेडेगावातील एका वाड्याच्या देवडीवर असणारा हा पहारेकरी का बरे रडत आहे? त्या वाड्यात एक थोर क्रांतिकारक राहत होता. मला वाटते उल्हासकर दत्तच. त्यांची सुटका झाली होती. त्यांना जरा वेड लागल्यासारखे झाले म्हणून सरकारने सोडले होते. ते त्या वाड्यात राहत. त्यांची स्मृती पुन्हा सतेज होत होती, भ्रमिष्टपणा नष्ट होत होता.
तो देवडीवाला रडत होता. त्याच्या हातात एक बंगाली वृत्तपत्र होते.
‘का रडतोस?’ क्रांतिकारकाने त्याला विचारले. ‘माझ्या जातीच्या एका माणसाला देशासाठी सहा वर्षांची शिक्षा झाली. म्हातारा आहे तो. चोपन-पंचावन वर्षांची त्याची उमर. या पत्रात आहे बघा.’
त्या वृत्तपत्रात गांधीजींच्या त्या ऐतिहासिक खटल्याची हकीकत होती. गांधीजींनी आपली जात शेतकरी, धंदा विणकराचा असे सांगितले होते. तो पहारेकरी मुसलमान होता. विणकराची त्याची जात. ते वाचून त्याचे डोळे भरून आले होते.
त्या थोर क्रांतिकारकाच्या सारे लक्षात आले. तो आपल्या आठवणीत लिहितो : ‘आम्ही कसले क्रांतिकारक? खरे क्रांतिकारक गांधीजी होते. सा-या राष्ट्राशी ते एकरूप झाले होते. मी शेतकरी, मी विणकरी, हे त्यांचे शब्द राष्ट्रभर गेले असतील. आपल्यातील कोणीतरी तुरुंगात चालला असं कोट्यावधींना वाटलं असेल. जनतेशी जो एकरूप झाला, जनतेशी ज्यानं संबंध जोडला, तोच परकीयांचा बंध तोडू शकतो. प्रणाम या ख-या महान क्रांतिकारकाला!”