बापूजींच्या गोड गोष्टी 7
७
बापूजी दिसायचे हाडकुळे. लोक म्हणायचे बापूजी म्हणजे मूठभर हाडांची जुडी. परंतु ते स्वत:च्या प्रकृतीची अत्यंत काळजी घेत असत. नीट नियमित आहार, फिरणे, मालीश सारे असे. देह हे सेवेचे साधन आहे. ते स्वच्छ, सतेज राखणे कर्तव्य. देह प्रभूचे मंदिर आहे. ते काळजीपूर्वक बलवान ठेवणे कर्तव्य. महात्माजी दुबळेपणाचे पुजारी नव्हते. त्यांना अशक्तपणा, मग तो मनाचा वा शरीराचा खपत नसे. भरपूर खा, भरपूर सेवा करा, असे ते म्हणायचे.
पूज्य विनोबाजींची प्रकृती जरा अशक्त झाली होती. विनोबाजींनाच १९४० साली महात्माजींनी पहिला सत्याग्रही म्हणून नेमले होते. विनोबाजींसारखी सत्य अहिंसेची मूर्ती आज महाराष्ट्रत, भारतात क्वचितच. साबरमतीच्या आश्रमात जी अगदी पहिल्याने सत्यार्थी मंडळी आली, त्यांच्यात तरुण विनोबाजी होते. असो.
विनोबाजी प्रकृतीची काळजी घेत नाहीत अशी तक्रार सेवाग्रामला गांधीजींजवळ करण्यात आली. गांधीजीं एके दिवशी विनोबाजींना म्हणाले : ‘तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस. तुला आता मी माझ्या ताब्यात घेतलं पाहिजे. तुझी प्रकृती चांगली दणकट केली पाहिजे.’
‘मला तीन महिन्यांची मुदत द्या. तेवढ्यात ती न सुधारली तर मग मला आपल्या ताब्यात घ्या.’ विनोबाजी म्हणाले.
हिंदुस्थानचा संसार शिरावर असणा-याला आपल्या प्रकृतीची चिंता कशाला, असे मनात येऊन इच्छाशक्तीचे मेरू विनोबाजी प्रकृतीकडे लक्ष देऊ लागले. तीन महिन्यांत त्यांनी आपले वजन २५ पौंड वाढवून दाखविले. महात्माजी आनंदले.
महात्माजींना धष्टपुष्ट माणसे हवी होती; दुबळी नको होती. दुबळेपणा म्हणजे पाप हे ध्यानात धरा.