बापूजींच्या गोड गोष्टी 86
८८
आज एक करुणगंभीर आठवण तुम्हांस सांगणार आहे. १९४३ मधील. ते दिवस कोण विसरेल? ‘चले जाव!’चा लढा ओसरला होता. जयप्रकाश जेलमधू निसटून पुन्हा संघटना बांधीत होते. आझाद-दस्ते ठायीठायी निर्मित होते. आणि गांधीजींचा आगाखान पॅलेसमध्ये उपवास सुरू झाला. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. लॉर्ड लिनलिथगो राष्ट्रपित्याला सोडायला तयार नव्हता. तिकडे चर्चिलसारखा कट्टर साम्राज्यवादी मुख्य प्रधान. गांधीजींची कोण कदर करतो? मुंबईहून काही व्यक्तींना गांधीजींना भेटायला जाता येत असे. त्यांच्याबरोबर काही बातमी येई.
गांधीजींची प्रकृती गंभीर होती, नाडी नीट नव्हती, डॉक्टर हताश होते. आम्ही महापुरुषाला सक्तीने अन्न देणार नाही, तशी विटंबना करणार नाही, असे त्यांनी सरकारला कळवले होते म्हणतात. गांधीजी देवाघरी गेले तर? सरकारने तीन दिवसांपर्यंत ही बातमी देशाला कळू द्यायची नाही असे निश्चित केल्याचे कळते. मोक्याच्या ठिकाणी अधिक लष्कर आणून ठेवण्यात आले. वेळप्रसंग आलाच तर सरकारने चंदनही गोळा करून ठेवले होते म्हणतात!
त्या दिवशी मुंबईस जयप्रकाश, अच्युतराव वगैरे सचिन्त बसले होते. सरकारने देशाला बातमी कळू द्यायची नाही असे ठरविले तरी आपण लाखो पत्रके काढून जनतेला कळवले पाहिजे असे कार्यकर्ते म्हणत होते. केव्हा कोणती बातमी येईल, काय भरवसा?
‘जयप्रकाश, तुम्ही पत्रक लिहून द्या. सर्व भाषांतून त्याची भाषांतरे करायला हवीत. अश्रू पुसा नि लिहा-’ अच्युतराव म्हणाले. मित्र सद्गदित होते. गांधीजी आपणातून गेले असे समजून लिहायचे. आम्ही ४० कोटी असून त्यांना मुक्त करू शकलो नाही! केवढी लज्जास्पद गोष्ट! जयप्रकाशांनी कागद हाती घेतला. एक शब्द लिहीत आणि अश्रू गळून तो धुतला जाई. असे ते अश्रूंनी भिजलेले पत्रक तयार झाले. मराठीत करायली त्याची एक प्रत मजकडे आली.
परंतु पुन्हा वार्ता आली की नाडी सापडू लागली. संकट टळले, राष्ट्र-तात जाणार नाही. महात्माजींच्या इच्छाशक्तीचा का तो विजय होता? स्वराज्य पाहिल्याशिवाय महापुरुष जाणार कसा? परंतु ती रात्र आठवली की अजून हृदय शतस्मृतींनी भरून येते!