बापूजींच्या गोड गोष्टी 23
२४
महात्माजी अखंड कर्मयोगी होते. त्यांचा क्षणन् क्षण सेवेत जाई. देशासाठी असा सतत झिजणारा महात्मा झाला नाही. परंतु महात्माजींच्या कर्मात आसक्ती नसे. कर्म ते आपल्या डोक्यावर बसू देत नसत. कर्मासाठी अट्टाहास नसे.
त्या वेळेस बोरसद तालुक्यात प्लेग झाला होता. सरदार आणि त्यांचे सहकारी सेवक बोरसदमध्ये धावले. स्वच्छतेची मोहीम सुरू झाली. उंदीर मारणे सुरू झाले, परंतु अहिंसेचा आधार घेऊन लोक उंदीर मारायला तयार होत ना. सरदारांनी महात्माजींस लिहिले. ‘उंदीर मारायला सांगा. नाहीतर लोक मरू लागतील.’ महात्माजींनी लिहिले, ‘माझ्याइतकाच लहानशा घुंगुरट्यालाही जगायचा हक्क आहे. परंतु मानवी जीवन अपूर्ण आहे. डास होऊच देऊ नयेत. उंदीर घरात येणार नाहीत असं करावं. मी काय सांगू? उंदीर मारायला हवेत.’
महात्माजी लिहूनच थांबले नाहीत. ते स्वत: बोरसदच्या शिबिरात येऊन दाखल झाले. उंदीर मारण्याच्या मोहिमेला जोर चढला. प्लेग हटू लागला. कधी कधी महात्माजी सरदार वगैंरेंबरोबर फिरायला जात, एकदा हसत सरदारांना म्हणाले, ‘माझी तुमची भेट नसती झाली तर कुठं वाहवत गेला असता, आं?’ असे दिवस जात होते.
एके दिवशी सरदारांसह सारे सकाळी कामाला जायला निघाले. महात्माजी म्हणाले, ‘तुम्ही सारे चाललात. मला काम द्या.’
‘तुम्ही इथं आशीर्वाद द्यायला असा. हेच तुमचं काम.’
‘नुसता बसून काय करू? मला एक खुळखुळा तरी आणून द्या. मी तो वाजवीत बसेन.’ सारे हसले आणि निघून गेले. कामाचे डोंगर उचलणारे बापू गंमतीने खुळखुळा वाजवायलाही तयार होते; अशी त्यांची बालवृत्ती होती.