बापूजींच्या गोड गोष्टी 57
५९
त्या वेळेस गांधीजी लंडनला गेले होते. दक्षिण आफ्रिकेतून हिंदी लोकांची बाजू विलायती लोकांसमोर मांडण्यासाठी ते गेले होते. एक दक्षिण आफ्रिका समिती त्यांनी तेथे स्थापिली. मोठमोठ्या लोकांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. ते वर्तमानपत्रांतून लिहीत, कोठे सभा असत. सारा दिवस, एवढेच नव्हे तर मध्यरात्रीपर्यंत काम चाले.
एका हॉटेलात ते उतरले होते. एके दिवशी दक्षिण आफ्रिका समितीची बैठक चालू होती. इतक्यात त्यांचे एक मित्र डॉक्टर जोशिया ओल्डफील्ड त्यांना भेटायला आले. गांधीजी बॅरिस्टर व्हायला गेले होते, त्या वेळेस जोशिया आणि ते एकाच घरात राहत होते. त्यांचा फार स्नेह.
जुना मित्र भेटायला आलेला पाहून गांधीजी बाहेर आले. थोडे बोलणे झाल्यावर ते डॉक्टरांस म्हणाले :
‘माझा एक दात फार दुखतो आहे तो काढून टाकता का?’
डॉक्टर ओल्डफील्ड यांनी दात पाहिला. दात काढणे कठीण होते. ते म्हणाले, ‘एखाद्या दंतवैद्याकडंच जायला हवं.’ गांधीजी म्हणाले, ‘मला वेळ नाही. इथल्या इथं पटकन काढलात तर मी फार आभारी होईन, बघा. कारण माझं सारं लक्ष या दाताकडं जातं आणि एकाग्र चित्तानं विचार करता येत नाही, काम करता येत नाही.’
डॉक्टर ओल्डफील्ड बाहेर गेले. दात काढण्याचा चिमटा त्यांनी कोठून तरी मागून आणला. जागा बधीर केल्याशिवाय दात काढणे फार त्रासाचे होते. गांधीजींनी समितीच्या लोकांना थोडा वेळ थांबायला सांगितले. ते आपल्या निजण्याच्या खोलीत आले, आणि डॉक्टर दात काढू लागले. काढायला जड गेले. परंतु गांधीजी शांत होते. त्यांनी सारी वेदना मुकाट्याने सहन केली. हायहुय काही नाही. दात काढून झाला. थोडी मिनिटे शांत बसले. नंतर हळू आवाजात डॉक्टरांचे आभार मानून ते आपल्या कामाला पुन्हा निघून गेले.