बापूजींच्या गोड गोष्टी 13
१४
गांधीजींना मुलांच्या संगतीत अपार आनंद वाटे. मुलांची संगत म्हणजे देवाची संगत. मुलांबरोबर ते खेळतील, हसतील, गंमत करतील. एका मद्रसी मुलाने बापूजींजवळ ‘कॉफी द्या’ म्हणून हट्ट धरला. तर त्यांनी त्या बाळाला आपण स्वत: होऊन कॉफी करून दिली. एवढेच नव्हे तर आणखी तुला काही करून देऊ का? इडली, डोसा करून देऊ का, म्हणूनही प्रेमाने त्यांनी त्याला विचारले. गांधीजी सुंदर स्वयंपाक करीत. गांधीजींना सारे येत असे. जीवनाला जे जे उपयोगी, ते ते त्यांना येत असे. गांधीजी सायकलवरसुद्धा बसत. परंतु ती गोष्ट पुढे सांगतो. आज दुसरीच जंमत सांगणार आहे.
१९२६ मधील ती आठवण आज सांगणार आहे. खादीच्या प्रचारार्थ महात्माजी दौ-यावर होते. विश्रांतीसाठी म्हणून काही दिवस ते साबरमती आश्रमात परत आले होते. साबरमती शांतपणे वाहत होती. आश्रमातील मंडळी स्नानासाठी नदीवर जात असत. कोणी डुंबत, कोणी पोहत.
‘बापूजी, आज तुम्ही पोहायला आलं पाहिजे.’
‘खरंच. आज बापूंना घेतल्याशिवाय जायचं नाही.’
‘परंतु बापू पोहणं विसरून गेले असतील!’
‘पोहणं का कुणी विसरतो! बापू, येता ना पोहायला? तुम्ही कसं पोहता ते आम्हांला पाह्यचं आहे.’
‘लोकमान्य टिळक पटाईत पोहणारे होते. गंगेच्या पुरात त्यांनी उडी घेतला. पलीकडे गेले.’
‘परंतु लोकमान्यांनी तालीम केली होती. बापू, तुम्हा आज दाखवा बरं पोहून. गंमत!’
‘बापू नुसते हसताहेत. ते चालणार नाही. चला आज आमच्याबरोबर पोहायला. चला!’
मुले आज गांधीजींना घेऊन उभी होती. वरीलप्रमाणे बोलत होती. आणि गांधीजींनाही नाही म्हणवेना. ते निघाले. मुले आनंदली. सारा आश्रम निघाला. साबरमती उचंबळली. तिचे तरंग नाचू लागले. आज बापू लाटांबरोबरच दोन हात करणार होते. ब्रिटिश सत्तेशी दोन हात करणारा योद्धा आज साबरमतीच्या लाटांबरोबर खेळ करणार होता. मुले पाण्यात शिरली, ‘बापू, या चला,’ म्हणून मुले म्हणू लागली, आणि गांधीजींनी उडी घेतली, सुरळी मारली, झपझप पाणी कापीत महात्माजी निघाले. मुले आनंदाने जयघोष करू लागली. टाळ्या वाजवू लागली. गांधीजींना टिपायला कोणी कोणी निघाली. मौज, केवढा आनंद! वयाच्या ५५ व्या वर्षी गांधीजी दीडशे यार्ड पोहून गेले! मुलांच्या आनंदासाठी बापू पोहून गेले! असे होते गांधीजी, असा होता आपला प्रेमळ राष्ट्रपिता.