बापूजींच्या गोड गोष्टी 1
१
लहान मुले म्हणजे आनंद. लहान मुले म्हणजे जगाची आशा. मुले म्हणजे निर्मलता; मुले म्हणजे उत्साह. मुक्त पुरुषांजवळ एक प्रकारची मुलांची वृत्ती असते. महात्माजी मुलांप्रमाणे निष्पाप होते म्हणून त्यांच्या गोष्टींना मुलाची गोष्ट सांगूनच मी आरंभ करणार आहे.
महात्माजींना मुले फार आवडत. जगातील सारे धर्मात्मे पहा. त्यांचे मुलांवर फार प्रेम असे. महंमद पैगंबरांना रस्त्यांत मुले भेटत. ती त्यांना बाजूला ओढत नेत व म्हणत, ‘किस्सा सांगा.’ किस्सा म्हणजे गोष्ट. येशू ख्रिस्तही मुलांचे मोठे प्रेमी. आणि आपला भगवान् गोपाल कृष्ण, तो तर गोपाळांबरोबर खेळे. महात्माजींनाही मुलांचे मोठे वेड. फिरायला जाताना ते मुलांना बरोबर घ्यायचे. जुहूच्या समुद्रतीरावर मुलाची काठी धरुन महात्माजी हसत जात आहेत, असे चित्र तुम्ही पाहिलेच असेल, परंतु मी जी गोष्ट सांगणार आहे ती साबरमती आश्रमातील आहे.
नित्याप्रमाणे आश्रमातून बापूजी फिरायला निघाले. आश्रमीय मुलेही निघाली. हसतखेळत फिरणे सुरू झाले. फिरताना महात्माजींची प्रश्नोत्तरे चालूच असत.
‘बापू, तुम्हांला एक विचारू?’ एका मुलाने प्रश्न केला.
‘हां, बेटा.’
‘अहिंसा म्हणजे दुस-याला दु:ख न देणे असा ना अर्थ?’
‘बरोबर.’
‘तुम्ही हसत हसत आमचे गालगुच्चे घेता. ही हिंसा की अहिंसा?’
‘अरे लबाडा!’ असे म्हणून मोठ्याने हसून बापूंनी त्याचा जोराने गालगुच्चा घेतला. टाळ्या वाजवून, ‘बापू चिडले. बापू चिडले!’ असे म्हणून मुले हसू लागली. हा पुरुषही हास्यरसात रंगून गेला.