बापूजींच्या गोड गोष्टी 56
५८
१९३१ मध्ये लंडनला असताना अमेरिकन वार्ताहरांनी गांधीजींना एकदा भेटायला आणि भाषण करायला बोलावले होते. गांधीजींनी आमंत्रण स्वीकारले. मीराबेनना बरोबर घेऊन ते गेले. गांधीजींसाठी शुद्ध शाकाहाराची व्यवस्था होती. गांधीजी बोलायला उभे राहिले. ते म्हणाले, ‘वार्ताहरांनी संयम शिकणं अगत्याचं आहे. मी जे काही तुम्हांला सांगणार आहे ते खाजगी नाही; किंवा नवीन नाही. परंतु तुम्हांला संयम शिकवायची मला इच्छा आहे. आजचा दिवस तुम्ही मौनाचा म्हणून पाळा. म्हणजे मी जे इथं बोलणार आहे ते कुठं लिहून पाठवू नका!’
सारे वार्ताहर तर लिहून घेण्याच्या इराद्याने जमलेले. निरनिराळ्या वृत्तपत्रांतून भाषणाचा अहवाल देता यावा म्हणून लेखण्या सरसावून आलेले. परंतु गांधीजींची विनंती त्यांनी मान्य केली आणि त्या अमेरिकन वार्ताहरांनी काहीही टिपून घेतले नाही किंवा काहीही प्रसिद्ध केले नाही.