बापूजींच्या गोड गोष्टी 21
२२
ते असहकाराचे दिवस होते. महात्माजी ज्वालायमान झाले होते. परदेशी कापडाच्या होळ्या करीत ते चालले होते. ‘सरकारी शाळा-महाशाळांवर बहिष्कार घाला,’ सांगत होते. रवींद्रनाथांना महात्माजींच्या या चळवळीत द्वेषाचा वास आला. त्यांनी तसे लिहिले. महात्माजींनी लिहिले, ‘परकी सरकारविषयी द्वेष पसरवणं हा तर माझा धर्म आहे. परंतु ही अप्रीती, हा द्वेष व्यक्तींकडे वळतो. सरकारी अधिका-यांचे मग खून पडतात. मी द्वेषाला व्यक्तींकडून वस्तूंकडे वळवीत आहे. परकी सरकारचे अधिकारी मारू नका. हे परकी कपडे जाळा, असं सांगून व्यक्तींवर घसरणारी हिंसा मी वस्तूंकडे वळवितो.’
रवींद्रनाथांनी लिहिले, ‘राष्ट्र आता कुठं जागं होत आहे. अशा वेळेस का द्वेषबुद्धीची गाणी शिकवणार? सकाळी पक्षी गोड गातात, मधुर गीत गात उंच आकाशात उडतात. आपण उंच न जाता क्षुद्र गोष्टीतच, वाईट गोष्टीतच रमणार का?’ महात्माजींनी उत्तर दिले, ‘सकाळी उठून पक्षी गात गात उंच उडतो हे खरं. परंतु आदल्या दिवशी त्याचं पोट भरलेलं असतं. आदल्या दिवशी तो उपाशी असता तर गोड गीत गात उंच उड्डाण करता ना.
रवींद्रनाथ म्हणाले, ‘पाश्चिमात्य शिक्षणावर बहिष्कार का घालता? राममोहन रॉय, लोकमान्य टिळक, इत्यादी थोर पुरुष म्हणजे या पाश्चिमात्य विद्येच्याच देणग्या नाहीत का?’
महात्माजी म्हणाले, ‘परकी भाषेतून शिक्षण घ्यावं न लागतं तर राममोहन रॉय, लोकमान्य हे आणखी मोठे झाले असते. परकी शिक्षणानेही त्यांची मूळची बुद्धी मेली नाही. कारण ती अनंत होती. कबीर, तुलसीदास, अशी रत्नं पूर्वी का लाभली नाहीत? परकी शिक्षणानं राष्ट्राचं अपार नुकसान झालं आहे. राष्ट्राचा आत्मा मारला आहे. लोकमान्यादिकांचा मूळचा अंकुरच जोरदार, म्हणून तो टिकला.’