बापूजींच्या गोड गोष्टी 85
८७
काही महिन्यांपूर्वी जयप्रकाश मद्रस प्राताच्या दौ-यावर गेले होते. अलीकडे त्यांच्या पत्नी प्रभावतीदेवीही छायेप्रमाणे त्याच्याबरोबर असतात. आणि कन्याकुमारीचे दर्शन घ्यायला दोघे गेली. बरोबर मित्र होते. भारताचे ते शेवटचे टोक. दोन महासागर एकत्र मिसळत आहेत. उसळत आहेत. अरबी समुद्र आणि इकडचा बंगालचा उपसमुद्र दोघे हातांत हात घेत आहेत. अतिगंभीर नि उदात्त असे ते दर्शन आहे म्हणतात. तेथे एका बाजूला सूर्य मावळताना दिसतो, तर तिकडे चंद्र वर येताना दिसतो. पूर्व-पश्चिम समुद्रांचे भव्य दर्शन. येथील दृश्य पाहून विवेकानंदांची समाधी लागली होती. गांधीजी येथील दृश्य पाहून भावगंभीर झाले होते. निसर्गाचे सौंदर्य बघायला गांधीजींना वेळ कोठे असे? परंतु एकदा विलायतेत जाताना रात्रीच्या वेळेस बोटीतून सागराकडे बघत असताना त्यांचा फोटो आहे. दार्जिलिंगजवळ देशबंधूंच्या आजारात त्यांच्याजवळ ते होते. तेथून हिमालय दिसे; नि आपल्या गुजराती नवजीवन पत्रात त्याचे किती सुंदर वर्णन त्यांनी केले होते. कन्याकुमारी पाहून गांधीजींच्या मनावर विलक्षण परिणाम झाल्याचे सांगतात.
जयप्रकाश व प्रभावती य़ांनी ते उदात्त दृश्य पाहिले. त्या दिवशी शुक्रवार होता, महात्माजींचा निर्याण-दिन. त्या दिवशी प्रभावती निराहार असतात. समुद्रस्नान करून त्या आल्या. ते अमर दृश्य पाहून त्या आल्या, आणि खोलीत कातीत बसल्या.
त्याच खोलीत गांधीजींबरोबर पूर्वी त्या उतरल्या होत्या. गांधीजी ज्या खोलीत राहिले होते, तीच ती खोली. प्रभावतींना शतस्मृती आल्या.
‘इथेच बापू उतरले होते. – इथेच.’ त्या म्हणाल्या. त्यांना अधिक बोलवेना. बापूंचे स्मरण करीत त्या झोपी गेल्या.