बापूजींच्या गोड गोष्टी 58
६०
गांधीजी जन्मजात वैद्य होते. शुश्रूषा करणे त्यांना फार आवडे. आरंभीआरंभी आजा-यांची सेवा करणे, हा त्यांचा छंद होता. परंतु स्वत:च्या आध्यात्मिक विकासासाठी पुढे त्यांना ती आवश्यक वस्तू वाटू लागली.
१९३० च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीला व्हाइसरॉयांबरोबर महात्माजी वाटाघाटी करीत होते. सत्याग्रह सुरू होता. हजारो सत्याग्रही तुरुंगात होते. व्हाइसरॉयांबरोबर काही मुलाखती झाल्या परंतु तडजोडीची आशा दिसेना.
‘जर शक्यता नसेल तडजोडीची, तर इथं कशाला राहू? एकमेकांचा वेळ फुकट दवडण्यात काय अर्थ? खोटी आशा काय कामाची? आपलं जमत नाही असं जनतेला मोकळेपणानं जाहीर करू या.’ गांधीजी व्हाइसरॉयसाहेबांस म्हणाले.
‘खरी परिस्थिती लोकांसमोर ठेवण्यात धैर्य आहे, ही गोष्ट खरी. आपण मग सेवाग्रामला कधी जाल?’ व्हाइसरॉयांनी विचारले.
‘शक्य तर आजच संध्याकाळी. अर्थात मी तुमच्या स्वाधीन आहे. तुम्हांला माझी जरूर असेल तोवर मी राहू शकेन. परंतु जरूर नसेल तर मला जाऊ द्या मला सेवाग्रामला. माझं हृदय तिथं आहे. किती तरी आजारी लोक तिथं आहेत. माझ्या सहका-यांपैकी बरेचसे ते आहेत. त्यांच्याजवळ असण्यात माझं सारं सुख असतं. सेवाग्रामला जायला मी अधीर आहे.’ बापू म्हणाले.