बापूजींच्या गोड गोष्टी 4
४
मनाच्या एकाग्रतेत विलक्षण शक्ती असते. मन एकाग्र करूनच एकलव्य धनुर्विद्या शिकला. मन एकाग्र केले तर सारे प्रश्न सुटू शकतात. सूर्याचे किरण भिंगातून एकत्र करून कापसावर पाडले तर ठिणगी पडते. विखुरलेल्या किरणांत ही शक्ती नाही. मनाची शक्ती विखुरलेली असेल तर तुम्हांला जगात सिद्धी मिळणार नाही.
महापुरुषांजवळ अशी एकाग्रता असते. प्रयत्नाने, ब्रह्मचर्याने ते ती मिळवतात. विवेकानंद अमेरिकेत असताना एक बाई तापाने फणफणताना त्यांनी पाहिली. ते तिच्याजवळ गेले. तिचा हात हातात घेऊन ते ध्यानस्थ उभे राहिले. नंतर जोळे उघडून ते म्हणाले : ‘तुमचा ताप गेला आहे.’ आणि खरेच ताप गेला. मनाची अशी संकल्पशक्ती, इच्छाशक्ती असते. म्हणून दुस-याचे भले चिंतावे. आपल्या मनातील विचारांचाही परिणाम जगावर होतो. एकाग्र विचारांचा तर फारच होतो.
मी तुम्हांला सांगणार आहे बापूजींची गोष्ट. १९२७ मधील प्रसंग. बापूजी मद्रासला गेले होते. त्यांना कळले की ब्रिटिश मजूर पुढारी, प्रसिद्ध समाजवादी फेन्नर ब्रॉकवे हे मद्रास हॉस्पिटलात आजारी आहेत. महात्माजींची व्यापक सहानुभूती कशी स्वस्थ बसणार? अशा बाबतीत ते फार दक्ष असत. ते हॉस्पिटलमध्ये गेले. फेन्नर ब्रॉकवे अत्यावस्थ होते, ते बेचैन होते.
‘तुम्हांला भेटायला आलो आहे.’ गांधीजी म्हणाले.
‘कृपा’, ते म्हणाले.
‘कृपा प्रभूची, तुम्हांला फार त्रास का होतो?’
‘फारच अस्वस्थ वाटतं.’
‘का बरं?’
‘झोप तर बिलकूल लागत नाही. जरा झोप लागेल तर किती बरं वाटेल!’
‘खरं आहे. झोप म्हणजे रसायन’ असे म्हणून गांधीजी त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून उभे राहिले. त्यांनी डोळे मिटले. मन एकाग्र केले. त्यांनी का प्रभूची प्रार्थना केली? की स्वत:ची शांती त्या तप्त मस्तकात त्यांनी ओतली? थोड्या वेळाने डोळे उघडून तो म्हणाले:
‘आता तुम्हांला झोप लागेल. बरं वाटेल. सुखी व्हा.’
असे म्हणून गांधीजी गेले. ब्रॉकवे आपल्या ‘पन्नास वर्षांचा समाजवादी जीवनाचा इतिहास’ या सुंदर आत्मचरित्रपर पुस्तकात लिहितात : ‘काय आश्चर्य? गांधीजी गेले आणि जागा झालो तो किती हुषारी वाटली!’
एकाग्रतेत असे सदभुत सामर्थ्य आहे.