बापूजींच्या गोड गोष्टी 29
३०
महात्माजींचे जीवन प्रार्थनामय होते. ते हवेशिवाय जगू शकले असते, परंतु प्रार्थनेशिवाय जगू शकते ना. प्रार्थना त्यांच्या जीवनाचा आधार होता. ईश्वरावर त्यांची श्रद्धा होती. साक्षात्कार झाल्याची भाषा ते कधी बोलले नाहीत. परंतु तुम्ही समोर आहात हे जितके सत्य, तितकेच ईश्वर आहे हेही सत्य आहे. मला त्याचा भास होतो. त्या अनंत सत्याचे कधी अंधुक दर्शन होते, असे ते म्हणत.
त्या वेळेस महात्माजी आफ्रिकेत होते. जीवनाची साधना सुरू झाली होती. हिंदुस्थानातील भावी जीवनाचा संपूर्ण पाया आफ्रिकेत घातला जात होता आणि सत्याग्रह सुरू झाला होता. भारतीय जनता निर्धाराने उभी होती. आफ्रिकेतील भारतीय नरनारी नव-इतिहास निर्मित होती. शांत-दान्त महात्माजी दिव्य मार्गदर्शन करीत होते.
आज जरा गंभीर घटना होती. जनरल स्मट्स तर पोलादी मनुष्य गांधीजींची चळवळ हाणून पाडण्यासाठी तो उत्सुक; परंतु काय असेल तो असो. आत्मशक्तीचा त्याच्यावरही प्रभाव पडत होता. गांधीजींना त्यांच्याकडून बोलावणे आले होते. जोहान्सबर्गला जाण्यासाठी गांधीजी निघाले. स्टेशनवर पोलक आणि त्यांची पत्नी दोघे आली होती. महात्माजी आणि पोलक गंभीरपणे बोलत होते, परंतु बोलणे थांबले. यश येईल की अपयश?
पोलकांची पत्नी सचिंत होती. गांधीजींसाठी आपण काय बरे करावे, असे तिच्या मनात राहून राहून येई.
‘बापू, भाई-’ तिने हाक मारली. त्या काळी गांधीजींना बापूपेक्षा भाई या नावानेच संबोधीत. पोलक हे छोटे भाई, तर गांधीजी बडे भाई.
‘काय विचारायचं आहे? अशी तू सचिंत का?’ गांधीजींनी विचारले.
‘तुमच्यासाठी काय करू? तुम्ही तर वाटाघाटींसाठी जात आहात. मन खालीवर होत आहे. मी काय करू?’
‘प्रार्थना कर. अंत:करणपूर्वक प्रार्थना कर. याहून अधिक करण्यासारखं दुसरं काय आहे? गांधीजी शांतपणे म्हणाले.