बापूजींच्या गोड गोष्टी 32
३३
त्य़ा वेळेस महात्माजी दक्षिण आफ्रिकेत होते. फिनिक्स नावाचे मोठे शेत घेऊन तेथे त्यांनी वसाहत सुरू केली होती. सर्वांनी श्रमाची दीक्षा घेतली होती. महात्माजी पहाटे उठत. ते दळीत, पाणी भरीत, जोडे शिवीत, सुतारकाम करीत, शिवाय इतर कामे. सर्वांची देखभालही तेच करीत.
आश्रमात एका आश्रमीयाची मुलगी फार आजारी होती. गांधीजी तिला जवळ घ्यायचे. ती त्यांना चिकटून बसायची. दिवसभर त्यांना वेळ होत नसे.
सायंकाळ झाली. अंधाराच्या छाया पसरू लागल्या. अनंत आकाशाखाली आश्रमवासी मंडळी प्रार्थनेला जमली. ते पाहात बापू आले. मांडी घालून बसले. परंतु त्यांच्या मांडीवर काय आहे ते? ती लहान आजारी मुलगी. थकून भागून आलेले बापू त्या मुलीला खांद्याशी घेऊन हिंटवीत होते. ती त्यांना बिलगली होती; आणि प्रार्थनेची घंटा झाली. ती उठेल म्हणून तिला तशीच जवळ धरून बापू आले. प्रेमाने हलकेच त्यांनी तिला मांडीवर ठेवले. ती लहानगी झापली होती. प्रार्थना सुरू झाली. गांधीजींच्या मांडीवर लहान मुलगी आणि गांधीजी विश्वमातेशी एकरूप! अनंत आकाशाखाली मांडीवर आजारी मुलगी घेऊन प्रार्थना करणारे बापू! किती हृदयस्पर्शी दृश्य!