बापूजींच्या गोड गोष्टी 16
१७
आज निराळ्या धर्तीची गोष्ट आहे. तुम्ही कवी व काव्य-गायक श्री. सोपानदेव चौधरी यांचे नाव ऐकले असेल. ते सत्कवी आहेत, त्यांचे काव्यगायन म्हणजे अपूर्व मेजवानी असते. रेडिओवरून त्यांनी महात्माजींवर स्वत:ची कविता एकदा म्हणून दाखविली होती. त्यांनीच मला पुढील अनुभव सांगिला होता.
एकदा महात्माजींचा दौरा चालू असता ते खानदेशात आले होते. जळगावला प्रचंड सभा झाली. खेड्यापाड्यांतून हजारो शेतकरी आले होते. सभा संपून जनतेचा लोंढा परत माघारी जात होता. गोष्टी बोलत लोक जात होते. ते पहा दोन कोळी. त्यांची जाळी खांद्यावर आहेत. त्यांचे बोलणे चालले आहे :
‘गड्या, आपण लई पापी. गांधीबाप्पा तर अहिंसा सांगतो- आणि आपण दिनरात मासे पकडतो. आपलं सारं आयुष्य हिंसेत जातं. बरं धंदा न करावा तर करायचं काय? कोणाला मारू नका, ते म्हणाले आपण मच्छीमारीचा धंदा सोडून दिला तर दुसरा कोणता करता येईल? जवळ शेती ना भाती. नदीच्या पाण्यात आपली शेती, माशांची शेती. कसं करायचं?’
‘अरे पण तू चिंता का करतोस? गांधीबाप्पा आपल्याला बोलावतील. म्हणतील, मासे नका मारू. हिंसा नका करू. तुमच्यासाठी हा धंदा निवडला आहे. हा शिका नि नीट संसार करा. अरे, त्याला सगळ्यांची काळजी आहे. आपला पोटापाण्याचा प्रश्न का त्यांना दिसणार नाही? नवीन धंदा मिळाला की ही जाळी तोडून देऊ फेकून गिरणेत. तोपर्यंत चालवू हा धंदा. काय करायचं? परंतु गांधीबाप्पाला सर्वांची चिंता आहे. चल रात होईल.’