बापूजींच्या गोड गोष्टी 78
८०
१९२१ मध्ये बारडोलीचा लढा व्हायचा होता, परंतु पुढे १९२८ मध्ये झाला. १९२१ मध्ये का बरे नाही झाला? तयारी तर झाली होती. देशव्यापक सत्याग्रह सुरू करण्याआधी महात्माजी एका तालुक्यात प्रयोग करणार होते. तेथे स्वराज्य जाहीर करणार होते. सरकार मानायचे नाही, ठरविणार होते. त्यासाठी बारडोली तालुका त्यांनी पसंत केली होता. देशभर विजेसारखे वातावरण होते. ब्रिटिश सत्तेला न मानण्याचा सामुदायिक प्रयोग!
देशबंधू चित्तरंजनदास तुरुंगात होते. स्वयंसेवक संघटना बेकायदा ठरविण्यात आली होती. हजारो तरुण तुरुंगात होते. चंद्रशेखर आझाद माहीत आहे ना? अलाहाबादच्या बागेत पोलिसांजवळ लढताना पुढे हुतात्मा झाला. तो १९२१ मध्ये केवळ १५ वर्षांचा तरुण; परंतु त्या वेळेस त्याला फटके मारण्यात आले आणि बाळ चंद्रशेखर प्रत्येक फटक्यास ‘महात्मा गांधी की जय’ गर्जे! असे ते १९२१ हे वर्ष.
परंतु देशात विजेचे वातावरण असताना संयुक्त प्रांतात चौरीचुरा येथे दंगे झाले. पोलीस वगैरे जाळले गेले, लोक प्रक्षुब्ध झाले, आणि महात्माजी व्यथित झाले. बारडोलीचा लढा यशस्वी व्हायला हवा असेल तर सा-या राष्ट्राने शांत राहिले पाहिजे; अत्याचार कोठे होता कामा नये, असे महात्माजी निक्षून सांगत होते. बारडोलीच्या लढ्याविषयी व्हाइसरॉयांना त्यांनी पत्र लिहिले होते. परंतु चौरीचु-याची बातमी आली. गांधीजींनी लढा बंद ठेवला. ‘चौरीचुरा धोक्याची निशाणी आहे. देश शांती राखू शकणार नाही. मी लढा नाही सुरू करता कामा.’ अशा आशयाचे गांधीजींनी लिहिले. ते कठोर आत्मपरीक्षण नि राष्ट्रपरीक्षण होते. विद्युन्मय राष्ट्र गांधीजींचा निर्णय ऐकून हताश झाले. केसरी पत्राने : ‘बारडोलीचा बार फुकट गेला!’ म्हणून अग्रलेख लिहिला. राष्ट्राचा तेजोभंग करणे पाप, असे कोणी म्हणाले. देशबंधू तुरुंगात रागाने लाल झाले. गांधीजींची घोडचूक, असे म्हणाले. परंतु महापुरुष शांत होता, गांधीजी अविचल राहिले.
एकदा गांधीजींना कोणी विचारले : ‘तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस कोणता? कोणता दिवस तुम्हांला मोठा वाटतो?’ ते म्हणाले : ‘सारं राष्ट्र विरोधी असता बारडोलीचा लढा ज्या दिवशी मी मागे घ्यायचं ठरवलं. तो दिवस मी मोठा मानतो. माघार घेण्याचा तो दिवस; परंतु तो सत्याग्रहाच्या दृष्टीनं विजयाचा होता. अहिंसेचा तो विजय होता!’
जनतेला जो दिवस पराजयाचा वाटला तो महात्माजींना विजयाचा वाटला! ‘नाथाच्या घरची उलटी खूण!’