बापूजींच्या गोड गोष्टी 55
५७
वेब मिलर हे एक अमेरिकन वार्ताहर. त्यांनी ‘मला शांती मिळाली नाही,’ (I FOUND NO PEACE) नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी गांधीजींची एक सुंदर आठवण दिली आहे.
१९३१ मध्ये गांधीजी गोलमेज परिषदेसाठी विलायतेत गेले होते. एके दिवशी वेब मिलर त्यांना भेटायला आले. बरेच बोलणे झाल्यावर आपली सिगारेट ठेवण्याची डबी पुढे करून ते गांधीजींना म्हणाले, ‘या डबीवर तुमचीही सहा द्या.’ त्या डबीवर लॉईड जॉर्ज, प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी क्लेमेंको वगैरे प्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या होत्या. गांधीजींनी डबी हातात घेतली. उघडून पाहिली. हसून म्हणाले, ‘सिगारेटची ही पेटी. धूम्रपानाविषयी माझी मतं तुम्हांला माहीत असतीलच. माझं नाव तंबाखूनं झाकलं जावं हे मला कसं आवडेल? या डबीत कधीही सिगारेट ठेवणार नाही असं वचन द्याल तर मी सही करीन.’
वेब मिलर यांनी वचन दिले आणि गांधीजींनी सही दिली. त्या वेळेपासून तो अमेरिकन वार्ताहर त्या डबीत व्हिजिटिंग कार्डे ठेवी. तो लिहितो, ‘अनेकांच्या सह्या डबीवर होत्या, परंतु गांधीजींची सर्वांत स्वच्छ आणि स्पष्ट होती.’