बापूजींच्या गोड गोष्टी 11
११
मित्रांनो! महात्माजी निर्भय होते. प्रचंड हिंसेशी त्यांनी आत्मबलाने तोंड दिले. मरण तर त्यांना कधीच भुववीत नव्हते. त्यांच्याइतकी निर्भयता, वीरता दुस-या कोणात असणार? मृत्यू हा त्यांचा सन्मित्रच होता.
परंतु महात्माजी आपल्या प्रकृतीची अत्यंत काळजी घेत. शरीराची हेळसांड म्हणजे पाप मानीत. या देहावर समाजाची मालकी आहे. समाजाची ही ठेव आहे. त्या ठेवीचा दुरुपयोग करण्याचा मला हक्क नाही, अशी त्यांची भावना होती.
एकदा बापूजी फिरावयास निघाले. वाटेत त्यांना ठेच लागली. त्यांच्या अंगठ्यातून रक्त वाहू लागले. बाजूला कस्तुरबा होत्याच.
‘बा, लवकर तेलपट्टी आण. माझ्या अंगठ्याला बांध.’ बापूजी बोलले.
बा विनोदाने म्हणाल्या : ‘मरणाची भीती न दु:ख तुम्हांला नाही असं तुम्ही म्हणता ना, मग यत्किंचित् ठेच लागली, कुठे थोडं रक्त सांडलं, तर इतकं घाबरण्याचं कारण काय?’
बापूजी गंभीरपणे बोलले : ‘बा, या शरीराची मालकी जनतेची आहे. माझ्या हेळसांडपणानं जर आंगठ्यात पाणी शिरलं व तो अधिक बिघडला तर मला ७-८ दिवस काम करणं कठीण जाईल. त्यामुळे लोकांचं किती बरं नुकसान होईल? लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचा तो घात करणं होईल.
बा शरमल्या. त्यांनी ताबडतोब मलमपट्टी आणून बापूजींच्या आंगठ्यास बांधली.
राष्ट्राच्या हिताची किती काळजी होती बापूंना!