बापूजींच्या गोड गोष्टी 77
७९
हिंदुस्थानची नवीन घटना होत होती. लवकरच ती पुरी झाली. पंडित जवाहरलाल तर अधीर झाले होते. घटना मंजूर झाली की भारत हे ‘लोकसत्ताक राष्ट्र’ म्हणून तो घोषवणार होते.
आज राष्ट्रपिता नाही; परंतु भारताची घटना आज ना उद्या पुरी होणार, आणि हिंदुस्थान हे लोकसत्ताक सार्वभौम राष्ट्र होणार, हे ते जाणणारे होते. लोकसत्ताक राष्ट्रात नवीन घटनेनुसार कोणीतरी अध्यक्ष निवडला जाईल. स्वतंत्र हिंदचा पहिला अध्यक्ष? कोणाला मिळणार तो मान? कोणालाही मिळो!
या राष्ट्राचा पहिला अध्यक्ष कोण व्हावा, म्हणून महात्माजींना वाटत होते?
दिल्लीला भंगी वस्तीत त्या दिवशी सभा होती. हरिजन वस्तीत आज सायंप्रार्थना, तेथेच प्रार्थनोत्तर प्रवचन. त्या प्रवचनातील ते थोर उद्गार तुम्हांला सांगू? दिल्ली डायरीत ते आहे. महात्माजी म्हणाले, ‘एखाद्या भंग्याची मुलगी या राष्ट्राची पहिली अध्यक्ष व्हावी, अशी मला तहान आहे!’ पददलित पुढे यावेत म्हणून केवढी तळमळ! मला ते उद्गार वाचून पैगंबराच्या अशाच उद्गारांची आठवण होत असते. अका इराणी गुलामाला पैगंबरांनी स्वतंत्र केले होते. ते म्हणाले : ‘माझ्यामागून याने खलिफा व्हावे असे वाटते!’ जो कालपर्यंत गुलाम होता, तो सर्व मुसलमानांचा प्रमुख व्हावा ही पैगंबरांची इच्छा, तर भंग्याची मुलगी हिंदची पहिली अध्यक्ष व्हावी ही गांधीजींना असोशी! थोर ते थोर; कोठेही जन्मोत.